स्वतःचा यार बना!

ही कथा तुम्हाला ऐकायची असल्यास इथे👆🏽क्लिक करा.

स्वतःचा यार बना!

        तुझं चांगलं चाललं आहे यार.....माझं??? हां....माझं ठीकच चालू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक असा "यार" असतोच ज्याच्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम्स नसतात. प्रत्येकजण सतत आपल्या आपल्या आयुष्यातल्या त्या "यार" सोबत स्वतःची तुलना करत असतो. ह्यानं खरंतर काहीच साध्य होतं नाही. होतो तो फक्त त्रास. आणि हा त्रास जास्त व्हायला लागला की जे येतं, त्याला आजच्या साईन्टिफिक जगात डिप्रेशन म्हणतात. खरंतर ना आपण स्वतःला कोसत राहण्याच्या नादात आनंद शोधायचाच विसरून चाललो आहोत. हा आनंद छोट्या छोट्या गोष्टींचा पण असू शकतो आणि जेव्हा एखादा माणूस हा आनंद शोधण्याच्या मागे जातो ना तो स्वतःचा "यार" बनून जातो. एक नोवा इफेक्ट नावाची गोष्ट आहे त्यानुसार तुमचं बॅड लक हे खरंतर तुमचा गुड लक असू शकतं. कसं ते आपण समजून घेऊया. 
        ही कथा अश्याच एका माणसाची आहे जो स्वतःचा यार बनू पहातो आहे. दिवसभरातला शेवटचा शॉट लागला होता. ह्यानंतर पॅकअप होणार होतं. सेटवर सगळीकडे पिन ड्रॉप सायलेन्स झाला होता.लाईटस लागलेले होत
    कॅमेरे सज्ज होते. डायरेक्टर ने action म्हणताच सीन सुरु झाला. मास्टर, वाईड शॉट, क्लोस अप अश्या सगळ्या प्रकारच्या शॉट्स ने सीन शूट झाला. डायरेक्टर ने फुटेज चेक केलं. केशव डायरेक्टर जवळ गेला आणि म्हणाला, "सर....अजून एक टेक देऊन बघू का?" 

डायरेक्टर : नको मला हवं ते मिळालंय. 

केशव: सर....मला फीलच आला नाही काही. 

    डायरेक्टर थोडा वैतागून म्हणाला, "फील कशाला पाहिजे. हे बघ असा फील घेत बसलास ना तर तू सुद्धा ऑडियन्स सारखा बनून जाशील. इमोशनल. आपल्याला ऑडियन्सला इमोशनल करायचं आहे स्वतःला नाही. गाईज....पॅक अप. घरी जा रे शांत. इतका विचार करू नको."

    केशव च्या डोळ्यादेखत सगळं सामान काढून बाजूला ठेवण्यात येत होतं. लोकं आपली काम संपवून पसार होतं होती. मग केशव मेकअप रूम मध्ये गेला. कॉस्ट्यूम वाल्या माणसाकडे आपला कॉस्ट्यूम दिला. नेहिमीचे कपडे घातले. स्वतःच्या हाताने स्वतःचा मेकअप काढला आणि आरशात एकटक स्वतःलाच बघत होता. तो फारवेळ आरश्यासमोर उभा राहूच शकला नाही. केशव तसाच तडक सेट वरून निघाला. त्यानं त्याची बाईक काढली आणि सरळ घरचा रस्ता धरला. 
केशवच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. 

    गाडी चालवता चालवता केशव आता स्वतःशीच बोलत होता, "काय करतोय मी? का आलो मी या क्षेत्रात? स्वप्न पाहिलं फिल्म मध्ये काम करण्याचं आणि इथे सिरीयल मध्ये काम करतो आहे. आणि इथे सगळं टाइम वर. सगळं शिफ्ट नुसार. सिरीयल कुठे मी तर ९ ते ५ जॉब मध्येच आहे ना, ज्याचं ९ ते ५ च्या वेळेचं पण काही खरं नसतं असा जॉब. जो करायचा नाही म्हणून मी इथे आलो. मला तर वाटतं ९ ते ५ जॉब चांगला ह्या पेक्षा. या काम करा घरी जा. वेळच्या वेळेवर पगार. जे माझ्या डोक्यात चालूं आहे ना कटकट ती कुठे असती त्यांना. फार सिम्पल लाईफ असतं त्याचं." 
    केशव ची गाडी सिंग्नल ला थांबली आणि बाजूला त्याला एक जण कार मध्ये काचा बंद करून गाणे ऐकताना दिसला. "परवा निशात भेटला होता हेच तर सांगत होता. वाक्य न वाक्य लक्षात आहे माझ्या, "नाही रे.....तुमच्यासारखं कुठे आमचं...आमचं लाईफ म्हणजे ५ दिवस काम २ दिवस सुट्ट्या...महिन्याच्या शेवटी पगार. ह्या मध्ये सगळं बसवावं लागतं बघ. घरातले फंकशन्स, वॅकेशन सगळं. अरे तुला सांगायचं राहिलं, परवा कार बुक केली."

    "टोचतं असं बोलणं. त्याला टोचून बोलायचं नसलं तरी." हा विचार करत करत त्याने त्याच्या गाडीचा पहिला गियर असा काही टाकला ना की कोणीही ओळखू शकलं असतं डोक्यात बरीच गडबड चालू आहे ते आणि तो सिग्नल वरून निघाला. 
    
    गाडी जशी जोरात तसेच विचार सुद्धा जोरात पळत होतं, "बरं इथेच नाही थांबला तो....पुढे म्हणतो कसा गाढव. तू बोल. कसं असतं शूटिंग? काही गॉसिप असेल तर सांग ना. भारी आहे फिल्म च जग." 
मला आला होता राग, मी जरा चिडूनच मनातल्या मनात बोललो, की मी फिल्म नाही सिरीयल मध्ये काम करतो आहे. एक चान्स मिळावा फक्त फिल्म चा. असं टॅलेंट दाखवेल ना! का माझ्यात हे शिफ्ट मध्ये कामं करून टॅलेंट उरलंच नाहीए?"
    
    तितक्यात केशवाला शिट्टी चा आवाज ऐकू आला. त्या आवाजाने त्याची तंद्री तुटली. त्याने थोडं वळून पाहिलं तर पोलीस मामा हात दाखवत होते. केशवने नाईलाजाने गाडी पोलिसांच्या समोर आणून थांबवली. 
पोलीस मामा, "लायसेन्स?"

केशव ने आपलं लायसेन्स दाखवलं. 

पोलीस मामा, "गाडीचे पेपर?" 

केशव बॅगेत शोधण्यात वेळ घालवू लागला. 

    पोलीस मामा हसत म्हणाले, "राहूद्या साहेब....हेल्मेट कुठे आहे? तुमच्या डोक्याची काळजी आम्ही करायची होय?"
केशवाला एकदम आठवलं की मॉर्निग शिफ्टच्या गडबडीत तो हेल्मेट घरीच विसरला होता. 

केशव, "सर ते फक्त आज चुकून राहिलं घरी. रोज असत माझ्या कडे."

पोलीस, "मी कुठे रोज फाईन मारतो तुम्हाला? आजच मारणार आहे?" 

केशव, "सर ऐका ना....मला सवय आहे हेल्मेट ची. असं कधी होतं नाही जेंव्हा मी हेल्मेट वापरात नाही."

पोलीस मामा, "ते सगळं ठीक आहे साहेब. आज नाही ना हेल्मेट मग आज फाईन बसेल. उद्या मी काही नाही म्हणणार बघा."

    केशव तसाच पोलिसांच्या बाजूला उभा राहून त्यांना मनवण्याचा प्रयत्न करत होता. तेवढ्यात मागून एक आज्जी आल्या. जेवण करून फिरायला त्या निघाल्या होत्या. त्या दुरूनच हे सगळं बघत होत्या. त्यांना का कुणास ठाऊक पण केशव ला खूप पाहिल्यासारखं वाटतं होतं. त्या अजून जवळ आल्या आणि केशव कडे अजून निरखून पाहू लागल्या आणि जस त्यांच्या लक्षात आलं तसं त्यांना काही भानच उरलं नाही. त्या फक्त केशव कडे बघत राहिल्या जस काही एखादा आवडीचा हिरो दिसल्या वर व्हावं. 

    आज्जी पोलिसाना बाजूला करत केशव प्रयत्न गेल्या आणि म्हणाल्या, "तुम्ही सिरीयल मध्ये काम करता ना? अर्जुन? हो ना?"

केशव जरा गोंधळलेला होता. तो म्हणाला, "अं....हो.."

आज्जी, "अहो किती छान काम करतात तुम्ही. माझ्या घरातले सगळे आणि मी तुमची सिरीयल फार आवडीने बघतो आणि जसे दिसतात तुम्ही रोज टीव्ही वर अगदी तसेच दिसत आहात."

केशव अजून गोंधळून, "थँक यू आज्जी मला प्लीज अहो जाहो घालू नका. मी खूप लहान आहे तुमच्या पेक्षा."

आज्जी, "हो रे, पण कामं कसली मोठी मोठी करतो. त्या मामा ला चांगलाच धडा शिकवला तू. मी बघते ना तुझं काम आणि तुझी बुद्धी."

ह्यावर केशवकडे काहीच उत्तर नव्हतं. पोलीस मामा हे सगळं आश्चर्य चकित होऊन बघत होते. 

आज्जीनी एक नजर पोलिसांवर टाकली आणि म्हणाल्या,"का थांबवलं आहे ह्यांना? खूप चांगलं काम करत आहेत हे. तुम्ही असे चुकीच्या व्यक्तींना नका त्रास देत जाऊ."
आज्जी केशव ची गॅरन्टी घेऊन बोलत होत्या. हे बघून केशव चमकलाच. 

आज्जी, "मला ना तुमच्या सोबत एक फोटो हवा आहे. चालेल ना?" हे म्हणत म्हणत आज्जीनी मोबाईल काढून स्वतः सेल्फी काढला पण. इतक्यावर त्या थांबल्या नाहीत. त्यांनी केशवच्या हातात फोन देऊन अजून एक सेल्फी घेण्याचा आग्रह केला. मग केशव ने त्यांच्या सोबत एक छान सेल्फी काढला. 

पोलीस मामांसाठी हे सगळं नवीनच होतं. फोटो घेऊन आज्जी परत थँक यू म्हणून पोलिसांना ह्याला त्रास देऊ नका असं बजावून गेल्या. 

पोलीस, "का हो साहेब, तुम्ही सिरीयल मध्ये काम करता काय?"

केशव, "हो अश्यातच सुरु केलं आहे."

"कोणती सिरीयल", पोलीस मामांनी पुढचा प्रश्न केला. 

केशव, "ठरलं तर मग!"

पोलीस, "हाव काय? आधी सांगायचं की. चला जरा केबिन मध्ये चला काम आहे माझं तुमच्या कडे."

पोलीस त्याला पट पट बाजूच्या छोट्याश्या केबिन मध्ये घेऊन गेले आणि त्यांनी त्यांच्या बायको ला फोन लावला. कॉल लावता लावता पोलीस मामा म्हणाले, "अहो...माझ्या बायकोला फोन लावतुया...ती लई बघती हे "ठरलं तर मग" एक दोन शब्द बोला की. फार खुश होईल बघा ती."

केशवला त्याच्या सोबत काय घडत होतं काही समजत नव्हतं. 
बायको ने जसा फोन उचलला पोलीस मामा म्हणाले, "ऐ...शीतले...हे बघ माझ्या सोबत कोण हाय! आज तुला सरप्राईझ देण्यासाठी केला म्या फोन." त्यांनी फोने केशव च्या चेहऱ्यासमोर धरला. केशव स्माईल करत होता. त्याला अजून काय करावं हे पण सुचत नव्हतं. 

पोलिसाच्या बायकोने व्हिडिओ मध्ये कोण आहे ते बारीक पाहिलं आणि म्हणाली, "कुठे तरी पहिल्या सारखं वाटतं आहे हो." 

पोलीस मामा, "अगं, असं काय करती तू...रोज बघती ना ह्यांना टीव्ही वर...अर्जुन आहे हे अर्जुन."

ती इतकीच अश्यर्यचकित झाली आणि खूप खुश होऊन बोलू लागली, "काय नशीब बाई माझ्या नवऱ्या चं. अर्जुन असे कसे भेटले तुम्हाला. अर्जुन राव कसे आहात आपण? तुम्ही खूप छान दिसता हं. आणि काय छान काम करता. काय छान वाईट माणसांना डोक्याने उडवता. काय काय सांगावं की.."

केशव ला इतकं ऑकवर्ड कधीच वाटलं नव्हतं. पण तो जमेल तसं बोलत होता. 
केशव, "थँक यू...मला छान वाटलं तुम्ही सगळे एपिसोड बघतात ते."

बायको, "सगळे???? अहो मी रिपीट बघते रोज. पण आमचे हे कुठे भेटले तुम्हाला?"

पोलीस मामा, "अगं...हेल्मेट घातलं नव्हतं ह्यांनी म्हणून थांबवलं होतं मी.."

पोलीस मामांची बायको त्यांना तोडत म्हणाली, "हे बघा...तुम्ही अजून कोणाला पण थांबवा. पण अर्जुन राव आत्ताच्या आत्ता घरी गेले पाहिजे. माहिती तुमचं ट्रॅफिक कंट्रोल." 

पोलीस मामा, "हो..हो...मी सोडणारच आहे त्यांना. तुला छान वाटलं ना भेटून?"

बायको, "हो....एकदा समोरासमोर पण भेट घेऊया...पण आजचा दिवस खूप छान झाला जे मला तुम्हाला बोलायला मिळालं." 

पोलीस मामा,"हो..हो..चल ठेवतो आता फोन." मामांनी फोन ठेवला केशव कडे पाहिलं आणि म्हणाले, "तुम्ही मोठे नट आहात म्हणून सोडत नाहीये साहेब...नियम हे सगळ्यांसाठी सारखेच असतात. पण तुमच्या कामामुळे लोकांच्या मनात आनंद निर्माण होतो. असे कित्तेक जण आहेत जे तुमच्या मुळे चेहरा इतका आनंदी आणि खुश ठेवतात. असंच काम करत रहा. आज फक्त वॉर्निंग देऊन सोडतो आहे. पुन्हा कुठला ही नियम तोडू नका."

केशव ला इतका आनंद कधीच झाला नव्हता. 

केशव मनापासून थँक यू थँक यू म्हणत गाडीवर बसला आणि पुन्हा एकदा आपल्या घराकडे निघाला. 

        ह्यावेळेस जेव्हा तो गाडी चालवत चालवत विचार करत होता ना तेंव्हा त्याला खूप वेगळं वाटू लागलं होतं. त्याच्या मनात कुठल्याही शंका नव्हत्या. कसलीच चिंता नव्हती. काही वेळापूर्वी निघताना मनात जे वाईट विचार येत होते त्या विचारांची जागा आता पॉसिटीव्ह विचारांनी घेतली होती. त्याला आता असं पण वाटतं होत की बरं झालं मी हेल्मेट विसरलो, विसरण्यामध्ये पोलिसांनी पकडलं आणि हे सगळं अनुभवायला मिळालं. 
    आपण जर ऍक्टर नसतो तर असं कधी झालंच नसतं. ऍक्टिंग हे प्रोफेशन मी एकदम बरोबर निवडलं आहे कदाचित ऍक्टिंग ने मला निवडलं आहे. का झालो ऍक्टर? अजून काही करायला पाहिजे होतं का? असले विचार करण्यापेक्षा जे माझ्या हातात आहे तेच छान केलं पाहिजे मी. इतके लोकं प्रेम करतात मला माहितीच नव्हतं. आता तर अजून छान आणि अजून सगळ्यांना आवडेल असं काम करायचं आहे मला. आणि अश्या प्रकारे केशव स्वतःचाच यार बनला. 

        मी सुरवातीला बोलो होतो ना नोव्हा इफेक्ट बद्दल. त्या सूत्रानुसार तुमचं बॅड लक हे तुमचं गुड लक असू शकतं. बरेचदा नोव्हा इफेक्ट आपल्या आयुष्यात घडून गेलेला असतो पण आपल्याला लक्षात येत नाही. तुम्हीच विचार करा. तात्पुरत्या वाईट वाटणाऱ्या गोष्टी तुम्हाला आयुष्यात खूप काही तर मोठं देऊन जातात. जर तुम्ही त्या घटनेकडे नोव्हा इफेक्टच्या दृष्टीतून बघण्यासाठी सुरवात केली तर. म्हणतात ना "जे होतं ते चांगल्या साठीच होतं" हाच असतो नोव्हा इफेक्ट. 
        तर आठवा काय असं झालं आहे तुमच्या आयुष्यात वाईट की ज्या मुळे तुम्हाला खरं तर नवीन चांगली आणि अजून मोठी संधी मिळाली. ह्या नोव्हा इफेक्ट च्या दृष्टीतून जर आपण जगाकडे पाहू लागलो ना तर आयुष्य खूप सुंदर आणि सोप्प होईल. 

सेल्फ टॉक करण्याचा सुटला आहे सगळी कडे वारा,
आणि अजिंक्यचा तुम्हाला सगळ्यांना सायोनारा.


लेखक - ऋषिकेश भावठाणकर आणि अजिंक्य कवठेकर 
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

If you like to read such short stories make sure you subscribe to our email newsletter. One email every Sunday to your inbox. Click here to subscribe. Sunday Newsletter.

And if you like to listen to such books and stories make sure you download KUKUFM.

Experience the magic of storytelling like never before with Kukufm, your go-to audiobook platform!

Immerse yourself in a vast library of captivating audiobooks spanning a multitude of genres,

all at your fingertips.


As an affiliate partner, I'm excited to offer you an exclusive opportunity to get a whopping 50% off on your Kukufm subscription when you purchase through my link.

But hurry, this offer is available for a limited time only! Click the link below and join Kukufm today!

GRAB THE OFFER NOW!

Click here to get your yearly subscription at 50% OFF.


Post a Comment

3 Comments

  1. खूप छान लिहिले आहेस अजिंक्य, असेच लिहीत रहा.

    ReplyDelete
  2. More power to an Emerging Podcaster! Beautiful Concept & Narration!

    ReplyDelete
  3. मस्त लिहिले आहे

    ReplyDelete