दिवाळी आणि फटाक्यांच्या आवाज!

           


            दिवाळी आली म्हणलं की सगळ्यात आधी लहान मुलांच्या आवडीची गोष्ट म्हणजे फटाके. मी पण लहानपणी खूप फटाके उडवले आहेत. प्रत्येक प्रकारचे, आवाजाचे, रंगाचे अगदी सगळे. मला लहानपणी वाटायचं की मोठे लोकं का आमच्या लहान मुलांसारखे फटाके उडवत नाहीत? पण मोठं होता होता हवा प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, किंमत हे विषय समजू लागले.

            पण आजचा विषय प्रदूषण किंवा किमतीचा नाही. दिवाळीत फटाके नक्की उडवावे आनंद साजरा करावा. पण एक गोष्ट मी मागच्या काही वर्षांपासून बघत आलो आहे ना मला वाटलं त्या वर लिहावं. होतं काय ना आज काल अगदी प्रत्येक घरामध्ये कार असते. कार नसली तर २ व्हिलर तर असतेच असते. त्यात राहण्याच्या ज्या जागा आहेत ना त्या झाल्या आहेत छोट्या. जागा छोट्या झाल्या म्हणजे बांधकाम, गाड्या हे सगळं वाढलं त्या मुळे जागा छोट्या वाटू लागल्या.


            पण दिवाळी ला फटाके उडवायचे हा खेळ तर आहे तसाच राहीला की. उलट फटाक्यांचे प्रकार पण निघाले आहेत वेगवेगळे आणि उडवायला जागा कमी. पण तरीही दिवाळी सारखा सण आपण नाही तर कोण साजरं करणार म्हणून सगळेजणं असेल तश्या जागेत फटाके उडवतात. 

            आता तुम्ही म्हणाल हो रे समजलं हे सगळं विषयाचं बोल की. सांगायचं काय आहे तुला? प्रदूषण नको फटाके कमी उडवा सांगायचं आहे का? नाही.  मग ध्वनी प्रदूषणा बद्दल काही सांगतो आहेस का? नाही. मी बोलतो आहे आवाजा बद्दलच पण तो फटाक्यांचा नाही. फटाके उडवून उडवून कधी कधी आपल्या फटाक्यांच्या आवाजामुळे शेजाऱ्यांचा आवाज वाढतो त्या बद्दल. 

            बरोबर आहे त्यांचं. आवाजामुळे त्रास होतो तर का नाही बोलणार ते. जागा छोट्या झाल्या म्हणलो ना मी त्याचा हा परिणाम. जे फटाके आधी जितके जोरात वाजत नव्हते ते आता वाटू लागले आहेत आणि म्हणून बाचा-बाची होते. आणि पू. ल. म्हणतात सगळ्यांचा बा निघतो अशी बाचा-बाची. 

            पण ह्याला उत्तर काय? फटाके उडवणं बंद? नाही, ते शक्य नाही. आम्ही फॅक्टरी मधून एक महिना आधीच फटाके बुक करतो हो. दिवाळीचा आनंद हा फटक्या शिवाय कसा? असे उत्तर मिळतील जर उडवू नका म्हणून दाखवलं तर. आणि जे बरोबर ही आहे. आपण कोण कोणाला फटाके उडवू नका सांगणारे. 

            मग काय करावं? अहो दिवाळी आहे थोडं सहन करा. काय झालं फटाक्यांचा आवाज आला तर. नाही. आमच्या घरी पेशंट आहे. त्याला त्रास होतो आवाजाचा. इतकं तुम्हाला समजू नये का? हे पण बरोबर आहे. घरी कोणी आजारी आहे, लहान मूल आहे तर होऊ शकतो त्रास. असं कसं म्हणावं होऊ द्या त्रास दिवाळी आहे.

            एक का कहना सही है, लेकिन दूसरे का गलत भी तो नहीं है!

            हे असे प्रसंग तुम्ही नक्की अनुभवले असतील. नसतील अनुभवले तर उत्तम. तुम्ही खूपच छान अश्या जागेवर रहातात जिथे कोणालाही फटाक्यांचा त्रास होतं नाही किंवा फटाके त्रास होईल असे कोणी उडवत नाही. पण असा त्रास होत असेल तर काय? ह्या वर सहसा एकच उपाय असतो.

भांडण

तुमच्या मुलांना अक्कल नाही, एकदा सांगून कळत नाही का?, दिवाळी ला फटाके नाही तर मग काय संक्रांती ला उडवू का?, इतकाच त्रास होतो तर दार बंद करून बसा!, तुझं घर साऊंड प्रूफ करून घे, हे असलं सगळं ऐकायला मिळेल. 

            मला हे प्रसंग पहिले ना की बोक्या सातबंडे नावाचा एक सिनेमा आठवतो. सिनेमा पहिला नसेल तरी बऱ्याच जणांना दिलीप प्रभावळकर ह्यांनी लहिलेलं हे पुस्तक नक्की माहित असेल. बोक्याच्या त्याच्या मित्रांसोबतच्या खोड्या आणि त्या मुळे संपूर्ण गल्लीला होणार त्रास आणि आपल्याला वाचायला किंवा बघायला येणारी मज्जा आणि शिकवण हे चित्रपटात किंवा पुस्तकात पुरेपूर भरलेलं आहे. 

            ह्या मूवी मधला एक सीन सांगतो. सगळे मुलं क्रिकेट खेळतं असताना बॉल जातो बेलवंडी आज्जी आजोबांच्या घरात. सगळे मुलं बोक्याला पुढे ढकलतात आणि म्हणतात चांगलेच खडूस आहेत आज्जी आजोबा. तूच बोलून बॉल घेऊन ये. मागच्या वेळेस मी गेलो होतो तर मला बॉल चिरून दिला होता विळी वर. आता बोक्या ही मोठी जबाबदारी घेऊन बेलवंडींच्या घरी जाऊन बेल वाजवतो. 

            आजोबा दार उघडून विचारतात तू सातबंड्याण्यांचा बोक्या ना. तो म्हणतो हो. आजोबा, "काय काम आहे?" बोक्या घाबरत घाबरत म्हणतो बॉल पाहिजे होता. आणि मग येतात आज्जी.

आज्जी, "काय रे तुम्ही मुलांनी आम्हाला झोपू नाही द्यायचं ठरवलं आहे का? आम्ही कोणाच्या अध्यात नाही मध्यात नाही. मग का आम्हाला त्रास देतात? आम्ही येतो का तुम्हाला त्रास देण्यासाठी? तुम्ही का त्रास देतात मग? शंभरदा सांगितलं इथे क्रिकेट खेळू नका. सोसायटी ने नोटीस काढली तरी तुम्ही पोरं ऐकत नाहीत."

आजोबा, "तुम्ही लहान मुलं वेगळे. कॉलेजचे मुलं खेळतात आणि ऑफिसला जाणारी घोडी पण. सुट्टी च्या दिवशी तर नुसता धुमाकूळ. सकाळ, दुपार, संध्याकाळ. अंग गेल्या महिन्यात तर रात्र भर दिवे लावून क्रिकेट खेळत होते. एकदा जेवताना ताटात पडला बॉल. एकदा अंघोळ करताना बाथरूम ची काच फोडून मध्ये आला. आता कुठे बसून संरक्षण मिळेल सांग मला."

ह्या वर बोक्या उत्तरतो, "तुमचं खरं आहे. तुमचा त्रास मी समजू शकतो."

आज्जी म्हणतात, "समजू शकतो ना, मग क्रिकेट खेळायचं बंद का करतं नाही?"

ह्या वर बोक्या जे उत्तर देतो ना ते खूपच कमाल आहे आणि माझ्या मते त्या उत्तरात सगळ्यांना काही तरी शिकण्यासारखं आहे.

बोक्या, "खरं सांगू का? आम्हाला रहावत नाही ओ. लहानपणापासून क्रिकेट खेळायचे संस्कार झाले आहेत आमच्या वर. खुमखुमी येते. कुठे इंडिया ची वन डे मॅच असेल तर अजूनच. तुम्ही मला बॉल दिला, मी जाईल पण आमचं क्रिकेट थांबणार नाही. पुन्हा सुरु. खोटं कशाला बोलू?"

आजोबा,"तू निदान प्रामाणिक तरी आहेस. बाकीचे येतात तेंव्हा कधी कधी खेळणार नाही असे सांगून जातात."

बोक्या, "मी असं खोटं कबुल करत नाही. तुमच्या घरी परत बॉल येऊ नये याची शक्य तेवढी काळजी घेईल. प्लिज बॉल देता? प्लिज. प्लिज आजोबा?"

आणि आज्जी आजोबा बॉल परत देतात. इतकचं नाही प्रामाणिकपणे खरं सांगितलं म्हणून आज्जी एक लाडू पण देते. 

भांडणात नेमकं जिंकत कोण?

काय केलं बरं या बोक्याने? प्रामाणिकपणे खरं बोलला बस्स. 

आता फटाक्यांचा विषय घेतला तर शेजारी ओरडले म्हणून थोडा वेळ उडवणं बंद केलं, थोडा वेळ गेला की परत फटाके लावणं सुरु. हे असं वागून नक्कीच काही बदल होणार नाही. उलट भांडण वाढण्याची शक्यता आहे. 

तर ह्या दिवाळीत प्रामाणिकपणे समजून घेऊया नक्की आपल्या मुळे कोणाला त्रास तर होतं नाहीये ना. आणि होतं असेलच तर प्रामाणिकपणे कसा तो कमी करता येईल ह्याचा विचारही व्हायला हवा. 

मी तर आधी पासून म्हणतो भांडणांमध्ये कोण जिंकतो बरं? करा एक गेस करा! 

कदाचित तुम्ही म्हणालं जो जोरात ओरडून बोलतो तो जिंकतो, जो पूर्ण गल्लीला गोळा करतो तो जिंकतो. पण माझ्या मते कुठल्याही भांडणांमधला जिंकणारा व्यक्ती हा तो असतो जो भांडण होऊच देत नाही.

Happy Diwali

अजिंक्य कडून तुम्हाला आणि तुमचा संपूर्ण परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. 

ह्या दिवाळीत तुमच्या मध्ये जो एक लाईट आहे ना, प्रकाश त्याचा विजय व्हावा आणि अंधाररूपाने असलेले तुमचे सगळं विघ्न नष्ट व्हावेत हीच प्रार्थना मी करतो. 

दिवाळी ला मोठे मोठे फटाके उडवण्याचा सुटला आहे सगळी कडे वारा, 

आणि लेख वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अजिंक्यचा सायोनारा.


आणि तुम्ही जर माझाव्यापारच्या ई-मेल लिस्ट मध्ये नाही तर बरंच काही मिस करत आहात. 

इथे क्लिक करून आमच्या ई-मेल लिस्ट चे भाग व्हा.

हा पॉडकास्ट ऐकल्यावर डिस्क्रिपशन मध्ये असेलल्या लिंक वर क्लिक करून आजच आमच्या ई-मेल लिस्ट मध्ये या. तुम्ही जर आमच्या ई-मेल लिस्ट मध्ये असाल तर प्रत्येक रविवारी एक छान असा, स्वतःमध्ये चांगले बदल घडतील असा लेख तुम्हाला मिळेल.

Thank you.

Post a Comment

0 Comments