तुझीच आठवण काढली होती आत्ता, १०० वर्ष आयुष्य आहे तूला!

।। श्री ।।

#४ 

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        माझाव्यापारच्या पत्र व्यवहारात आपलं स्वागत आहे. आमचे पत्र आपण वाचत आहात आणि आपली प्रतिक्रिया देत आहात या बद्दल आपले खूप खूप आभार. मागच्या भागात मी एका पुस्तकाबद्दल सांगितलं. ह्या भागात बोलूया डॉक्युमेंटरी फिल्म्स बद्दल. 

        मला ना सध्या एक वेड लागलं आहे. ते म्हणजे Netflixवर डॉक्युमेंटरी बघण्याचं. हो तेच नेटफ्लिक्स "टुढुम" आवाज येतो ना सुरवातीला ते वालं. काहीही म्हणा कमाल असतात Netflixच्या डॉक्युमेंटरीस. तुम्हाला बघण्याची सुरवात करायचीच असेल तर एका डॉक्युमेंटरी फिल्मचं नाव सांगतो. "द मिनीमिलिस्ट" आपल्या प्रत्येकालाच वाढत्या जाहिरातींमुळे उगीचच काहीतरी विकत घ्यावं वाटतं. ही डॉक्युमेंटरी बघून तुम्हाला समजेल की नेमकं काय विकत घ्यावं.

        मलातरी आवडतात डॉक्युमेंटरी. नवीन माहिती मिळते. काही नवं जुनं काय चांगलं काय वाईट ते समजतं. अजून एक आठवली आत्ता मला "द सोशल डिलेमा" ही पण बघण्या सारखी आहे. ह्या दोन्ही डॉक्युमेंट्रीसचे ट्रेलर मी इथे खाली देतो आहे ते बघून ठरवा हे बघण्यात वेळ घालवायचा की नाही ते.



        पण मी ज्या डॉक्युमेंटरी बद्दल सांगण्यासाठी हा लेखं लिहीत आहे ना त्या ह्या दोन्ही पण नाहीत. ह्या दोन्ही पण बघण्या सारख्या आहेत पण अजून एक मस्त डॉक्युमेंटरी आहे ती म्हणजे "लिव्ह टु १०० - सिक्रेट्स ऑफ द ब्लू झोन्स" 
        ह्या डॉक्युमेंटरी मध्ये डॅन बुएटनर नावाचा व्यक्ती जो एक लेखक, नॅशनल जिओग्राफिक कडून जगभरात फिरणारा आणि गिनीस रेकॉर्ड मिळवणारा पण व्यक्ती आहे. असा हा व्यक्ती जगातल्या अश्या जागा शोधतो जिथे माणूस शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतो आणि त्यांच्या रोजच्या राहणीमाचा अभ्यास करतो. ह्या डॉक्युमेंटरी मध्ये तो हेच समजावून सांगतो की नेमकं काय केल्या मुळे हे सगळे शंभर वर्षापेक्षा जास्त जगत आहेत.
       तुमच्या पैकी कोण कोण आहेत ज्यांना शंभर पेक्षा जास्त वर्ष जगावं वाटतं? मी तर आहे त्या मधला. "काय करायचं आहे इतकं जगून" वगैरे म्हणणारा मी नाही. काय करायचं म्हणजे काय? मी लिहिलं अजून छान काही तरी, वाचनात वेळ घालवेल, बिझनेस करेल, शिकवेन माझ्या अनुभवातून कोणाला काही तरी, शंभर गोष्टी आहेत करण्यासारख्या. तर वाचणाऱ्या पैकी कोणी हा लेख २०९१ मध्ये वाचत असेल तर मला नक्की मेसेज करा. माझा रिप्लाय आला तर समजा मी टार्गेट पूर्ण केलं म्हणून. 
         मजेचा भाग बाजूला जरी ठेवला तरी लक्षात घ्या हे टार्गेट कोणी सेट करत नाही आयुष्यात? पैसा कमावणे, फिरायला जाणे, घर विकत घेणे, ते सगळे गोल्स सगळे ठरवतात पण मी तरी अजून कोणाला मी १०० वर्ष जगण्याच्या मिशन वर आहे असा गोल सेट केलेला पाहिलेलं नाही. कोणी असेल हे वाचणाऱ्या पैकी अश्या मिशन वर तर नक्की कळवा मला. मला तुम्हाला भेटायला आवडेल. 
       आता ह्या डॉक्युमेंटरीच्या चार भागात आपला होस्ट पाच जागांना भेट देतो. 
पहिली म्हणजे ओकीनावा, जापान मध्ये. 
दुसरी जागा आहे सार्डिनिया, इटली. 
तिसरी जागा म्हणजे इकारिया, ग्रीस. 
चौथी लोमा लिंडा, कॅलिफोर्निया. 
आणि पाचवी निकोया, कोस्टा रिका.


ओकिनावा जापान

        पहिल्यांदा जेंव्हा तो ओकिनावा मध्ये एका एकशे एक वर्षाचा आज्जींना प्रश्न विचारतो की, "मी काय करावं तुमच्या सारखं शंभर वर्ष जगण्यासाठी?" त्या आज्जी सांगतात की, "मी कायम आनंदात असते. मी कधीही कोणावरही चिडचिड करत नाही. माझ्या सोबत जो कोणी असेल त्याला मी आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करते आणि ह्या सगळ्या मध्ये अन्नाचा खूप मोठा भाग आहे." 
        मग त्या "हारा हाची बू" बद्दल सांगतात. ओकिनावातले लोकं ८०% पोट भरे पर्यंतच खातात. ह्या पद्धतीला ते "हारा हाची बू" म्हणतात. आणि मग त्या आज्जी गाणं म्हणून दाखवतात, त्यांच्या कडे गिटार सारखं एक वाद्य असतं ते वाजवून दाखवतात, सगळे सोबत गेम्स खेळतात. असा विचार चुकूनही करू नका की एकशें एक वर्षाची बाई म्हणजे अंथरुणावर झोपलेलीच असेल म्हणून. ह्याच कारणासाठी ही डॉक्युमेंटरी बघा. 
        अजून एक गम्मत सांगू का? हारा हाची बू जर तुम्हाला रोजच्या जीवनात आणायचं असेल तर खूप सोप्पा उपाय आपल्या पूर्वजांनी सांगितलेला आहे. पाटावर बसून जेवण करा. तुम्ही पाटावर पाहिजे आणि ताट खाली. करून बघा. पोटाच्या वर खाताच येत नाही. मी जे करून पाहिलं आहे तेच सांगतो आहे. तुम्हालाही हा अनुभव आला असेल तर मला नक्की कळवा. 

सार्डिनिया, इटली

        ही जागा बाकी जागांपेक्षा वेगळी होती. ह्या भागातले लोकं डोंगराळ भागात रहात होते. इथले घर अश्या पद्धतीचे होते की ज्या मुळे कायम चढावर आणि उतारावर चालावं लागायचं. अन्नाबद्दल अगदी प्रत्येकानीच सांगितलं पण इटलीच्या लोकांनी एक वेगळी गोष्ट सांगितली. 
        ह्या जागेवर आधी अशी पद्धत होती की घरातला मोठा व्यक्ती म्हातारा झाला की त्या एका डोंगराच्या कोपऱ्यावरून खाली ढकलून द्यायचं. हे सगळेच तरुण मुलं करायचे. पण एकदा एका तरुण मुलाची आयुष्यातली प्रगती बघून सगळ्यांनी त्याला विचारलं की असं कसं झालं की आम्ही आहोत तिथेच राहिलो आणि तू इतका मोठा झाला? 
         तो बाकी सगळ्यांना सांगतो की आपले वडील म्हातारे झाले म्हणून त्यांना डोंगराच्या टोकावर घेऊन तर गेलो पण मी त्यांना मारू नाही शकलो. ते आजही जिवंत आहेत. इथून दूर मी घर बांधलं आहे तिथे मी त्यांची सेवा करतो आणि त्यांनीच मला शिकवलं म्हणून मी इतका मोठा होऊ शकलो. तर सार्डिनिया मधले लोकं हे आजही घरातल्या मोठ्यांसोबतच रहातात. 
        आणि त्यांनी हे एक रहस्य सांगितलं शंभर वर्षाच्या वयाचं. जे मी लहान पणीपासून बघत आलो जगत आलो त्याला हे लोकं रहस्य म्हणत आहेत हे जाणवल्यावर मी खूप हसलो.

इकारिया, ग्रीस

        ह्या जागेची मज्जा अशी सांगितली जाते की इथे बरीच वर्ष यंत्र आले नाहीत. त्या मुळे इथले बरेच लोकं रोजची कामं करायला सुद्धा आजही जुन्या पद्धती वापरतात. मिक्सर, वॉशिंग मशीन हे ह्यांना माहितीच नाही. हे एक बेट आहे जिथे बरेच वर्ष कोणी येऊ शकलं नाही आणि त्यांना जगण्यासाठी कोणीतरी येईल आणि मदत करेल अशी अपेक्षा ही नव्हती. 
        इथे सुद्धा होस्ट एका एकशेपाच वर्षांच्या आजोबांना भेटतो जे त्याला भेटायला घोड्या वरून येतात. घोडा पळवत पळवत. पहिली गोष्ट माझ्या डोक्यातली हे सगळं पाहून आरसा फुटावा अशी फुटली ना, ती म्हणजे म्हातारं होणं म्हणजे झोपून राहणं, काम न करणं, आता माझ्या कडून होणार नाही हा विचार, गोळ्या घेऊन घेऊन जगणं ह्या पेक्षा पण वेगळं काही तरी असू शकतं, ही डोक्यात घुसली. 
        आणि राहिली गोष्ट मशीन्स न वापरण्याची, एक सोप्पा उपाय सांगू का कमीत कमी लिफ्टचा वापर करणार हे आज डोक्यात पक्कच करून घ्या. आपल्या मनाला आपण जितके आरामात राहू तितकं आवडतं असतं. माझा प्रयत्न नेहिमी असतो की पाच मजले तरी मी चढून मग लिफ्टचा विचार करतो. 

ह्या सगळ्यात करावं काय मग शेवटी मी?

        हा प्रश्न पडला आहे तर चांगलंच आहे. मी ह्या डॉक्युमेंटरीच्या चार भागांमधून मी काय शिकलो ते तुम्हाला २-५ ओळीत सांगतो. 

पहिले तर हाता पायांचा वापर जास्तीस्त जास्त करा. हो..दुखले तरी. हातांनी जास्तीस्त जास्त कामं, पायांनी जास्तीत जास्त चालणं आणि दोन्हींचा वापर करून बाग काम केलं तर अतिउत्तम. दुसरं असं की कुटुंबा सोबत रहा. आपल्या सोबतच समूह हा कमालीचा असावा. तिसरं "प्लांट बेस डाईट"चा प्रयत्न राहू ध्या आणि चौथी शिकवण म्हणजे समाजाला परत देण्यासाठी काही तरी ध्येय ठेऊन काम करा.

ही डॉक्युमेंटरी तुम्ही पहिली असेल तर मला कळवा कशी वाटली ते. बघितली नसेल तर वेळ काढून बघा आणि त्या नंतर मला कळवा कशी वाटली ते. आणि तुम्हाला शंभर वर्षाहून जास्त जगण्याची आणि समाजाला काही तरी नवीन शिकवण्याची प्रेरणा मिळावी अशी मी आशा करतो.

तुम्हाला जर असे लेख वाचायला मिळावे आणि मला ह्याची आठवण रहावी असं वाटतं असेल तर तुम्ही आमच्या ई-मेलच्या ग्रुपचा भाग बनू शकतात. आणि जर तुम्ही ई-मेल चेक कारण्यापैकी नाही तर आमची व्हॅट्सऍप कॉम्युनिटी जॉईन करू शकतात. इथे तुम्हाला नवीन लेख आला की नोटिफिकेशन मिळतं रहातील.

ई-मेल लिस्ट मध्ये सहभागी होण्या साठी इथे क्लिक करा. ई-मेल द्वारे पत्र व्यवहार.

व्हॅट्सऍप चॅनेल जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा. माझाव्यापार व्हाट्सऍप चॅनल.

मी लिहिलेल्या छोट्या कथा तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की तुमच्या जवळच्या व्यक्तींना पाठवा. ही कथा जर आवडली नसेल तर मला कळवा आणि छोट्या छोट्या विचारांनी प्रत्येक मनात जाण्याच्या आमच्या प्रयत्नाला बळ द्या. 

बऱ्याच वर्षांनी मराठी लिहितो आहे. लिहिण्यामध्ये जर कुठे गडबड जाणवली तर भावनेकडे लक्ष द्या इतकीच विनंती. 

कळावे लोभ असावा,

तुमचा मित्र, 

अजिंक्य 🙏🏼 🙏🏼 🙏🏼 

Post a Comment

4 Comments

  1. हारा हाची बू... भारीच...
    खरं तर आपले आई वडील, आजी आजोबा किव्हा घरातील इतर senior मंडळी yongsters ना हेच सांगत असतात... म्हणजे माझ्या बाबतीत तरी असच झालंय...पाटावर बसून जेवणे, आदर्श जीवनशैली याबद्दल बऱ्याच वेळा चर्चा होत असतात...
    आणि आजकाल short term happiness वर जास्त ओढ असल्यामुळें बरेच लोकं हे विसरतायेत...
    १०० वर्ष जगून माणूस खूप काही करू शकतो हे खरंय हा...काहीतरी aim असेल, समाजाला काही द्यायचं असेल तर नक्कीच...😉
    मस्त वाटलं वाचून...
    MPTY

    ReplyDelete
    Replies
    1. मग आज पासूनच सुरु कर पाटावर बसून जेवणं.
      छान वाटलं तुझी कंमेंट बघून.
      MPTY

      Delete
  2. व अजिंक्य नवीन वर्षाची छान सुरुवात केली... मराठी ब्लॉग राइटिंग ला तुझे विशेष अभिनंदन म्हणजे मराठी मधून विचार व्यक्त करण्यासाठी साठी आनंद, समाधान ,समाजसेवा, पर्यावरण सेवा या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीमधून सांगितलेल्या आहेत .आपण त्या थोड्या विसरत चाललो आहोत काही लोक तसा प्रयत्न करतात पण तितकं पुरेसं नाहीये. प्रत्येकानीच ते मनापासून केलं पाहिजे खरंतर तू सांगितलेल्या डॉक्युमेंटरीज आपण सर्व मिळून बघितल्या पाहिजे व त्यावर चर्चा करून काही ॲक्शन घेतल्या पाहिजे.MPTY

    ReplyDelete
    Replies
    1. नक्की प्लॅन करू सोबत बघण्याचा आणि मी आनंद, समाधान, समाजसेवा हे सगळेच विषय मांडणार आहे एक एक करत.
      Thank you

      Delete