।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मी असं समजून पुढे जातो आहे की मागच्या पत्राची पद्धत, थोडं लिहिलेलं, थोडं ऑडिओ हे तुम्हाला आवडलं आहे आणि तसे काही छोटे छोटे ऑडिओ मी प्रत्येक पत्रात देता का येतील का हा विचार नक्की करेल. आपल्या प्रतिक्रिया मला खूप आवडल्या. असेच माझे पत्र वाचत रहा आणि ओळखीच्या सगळ्यांना पाठवत रहा. मी हेच पत्र थोडा AI चा वापर करून इंग्लिश मधे पण लिहून घेतलं आहे. परत परत काय सगळं इंग्लिश मधे लिहिणार ना? हेच पत्र इंग्लिश मधे वाचण्याची इच्छा असेल तर इथे क्लिक करू शकता 👉 English Version आणि मागच्या आठवड्याचं पत्र वाचायचं राहिलं असेल तर इथे क्लिक करू शकता 👉 गाणे लिहिणे ही काही सोप्पी गोष्ट नाही.
आज आपण आलो आहोत एका अश्या विषयावर जो मला खूप मनापासून आवडतो. फिल्म्स आणि त्या मधून शिकण्यासारखं काही तरी. मी लहानपणापासून कुठलाही चित्रपट उगीच बघायचा म्हणून नव्हतो बघत. मला पण आठवत नाही ही सवय कशी लागली ते, पण फिल्म्स, सिरियल्स, कार्टून्स हे सगळे काहीतरी चांगलं शिकण्याचे माध्यम आहेत असं मला आजही वाटतं.
माझ्या लहानपणी मला प्रचंड आवडलेला एक चित्रपट म्हणजे लगान. मला अजूनही आठवतं आहे मी फिल्म मधल्या एका सीन ला थेटर मधे उठून टाळ्या वाजवल्या होत्या. काय जादू केली होती काय माहीत? पण मी मोठा झालो आणि परत एकदा लगान बघितला आणि मला त्याच्या मधे लीडरशिपचे इतके उदाहरणं सापडले. मला ही फिल्म जरा जास्तचं आवडायला लागली. तुम्हीपण हा चित्रपट बघितला असेल पण आज आपण लगान हा लीडरशिपच्या नजरेतून बघूया. लेट्स गो!
Problem Solving Attitude / कठीण परिस्थती मधून मार्ग काढण्याची कला
सगळ्या कथेंमधे एक साम्य असतं ते म्हणजे प्रॉब्लेम, व्यथा. व्यथा नाही तर कथा कसली? काही तरी प्रॉब्लेम पाहिजेच आणि मग तो हीरो तो प्रॉब्लेम कसा सोडवतो ही झाली कथा. लगान ही एक हिंदी फिल्म्स मधली उत्कृष्ट फिल्म आहे. तुम्ही बघितली नसेल तर आवर्जून, वेळ काढून बघा. इंग्रजांविरुद्ध आपण सगळे लढलो, लगान मधे पण गावातले सगळे इंग्रजांविरुद्ध लढले फक्त काठी, तलवार घेऊन नाही तर क्रिकेट खेळून.
एका इंग्रजाकडे गावातले सगळे दयेची भीक मागायला जातात, की तुम्ही जो कर आमच्या वर लावत आहात तो आम्ही कसा भरणारं? आधीच पाऊस नाही. पाणी नाही. शेती होतं नाही. दुप्पट कर या वर्षी आम्ही कसा देणार? दया करा आणि आमचा कर माफ करा. तर तो इंग्रज अधिकारी त्या सगळ्यांना म्हणतो, "केला माफ कर. एक वर्षाचा नाही तीन वर्षांचा माफ केला. पण त्याच्या बदल्यात तुम्हाला आमच्या सोबत क्रिकेट मॅच खेळावी लागेल. तुम्ही जिंकले तर तीन वर्षांचा कर माफ."
आली की नाही व्यथा. आधीच पाऊस नाही, जो कर द्यायचा आहे तो नाही. या वर्षी दुप्पट द्यायचा तो वेगळाच आणि हे सगळं माफ होऊ शकतं तीन वर्षांसाठी, जर क्रिकेट खेळून इंग्रजांच्या टीम ला हरवलं तर. पण पुन्हा वेगळीचं व्यथा. क्रिकेट काय हे कोणाला माहिती नाही. कधी बॅट हातात धरली नाही. दुप्पट कर द्या नाही तर न येणार खेळ खेळून हारून कर पण द्या आणि मॅच हरलो म्हणून बदनामी पण करून घ्या. आहे की नाही प्रॉब्लेम वर प्रॉब्लेम.
इथे लीडरशिपचा पहिला धडा मिळतो!
प्रॉब्लेम कोणाच्या आयुष्यात नाही? कोणीही प्रॉब्लेम पासून पळू शकतं नाही. त्याला तोंड देऊन प्रॉब्लेम पेक्षा मोठे होऊनच पुढे जावं लागतं. लीडरशिप न शिकलेला प्रॉब्लेम समोर आला तर काय करेल? तेच जे ९९% लोकं करतात. रडणे, पळून जाणे, तक्रार करणे, द्वेष करणे, दुसऱ्यावर आरोप करणे आणि बरंच काही. थोडक्यात काय तर जबाबदारी न घेण्याचं काम तो करेल.
पण लीडर जो असतो ना त्याला व्यथेमधे पण संधी दिसतं असते. Looking at problems as an opportunity is a sign of Leadership. प्रॉब्लेम आहे तर आहे आता काय करू शकतो त्या बद्दल. हसत हसत तोंड देणे ह्याच्या पलीकडे आहे काही उत्तर? तर लगान फिल्मचा हीरो भुवन तेच करतो. सगळे गावातले रडतं असतात, क्षमा करा म्हणतं असतात, तेंव्हा तो उभा रहातो आणि म्हणतो "सरत मंजुर हें" म्हणजे आम्ही मॅच खेळण्यासाठी तयार आहोत.
प्रॉब्लेम कडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची कला जमली पाहिजे. जे लीडर नाहीत म्हणजे गावातले सगळे त्यांना काय दिसतं आहे की आपण छोटे आहोत, हे इंग्रज मोठे आहेत, थोडं माफी मागू म्हणजे आपला कर कमी करतील. क्रिकेट काय जमणार आपल्याला. आपण तर सगळे विट्टी दांडू खेळणारे. माफी मागू, रडू. प्रॉब्लेम सांगू. पावसाचं कारण देऊ. पण क्रिकेट नको.
आणि इथेच भुवन म्हणजे ज्याच्या मधे लीडरशिप चे गुण आहेत त्याला दिसतं की अरे ही तर कमालीची संधी आहे. आत्ता हे काही कर माफ करणार नाहीत. द्यावा लागला तर घर विकून द्यावा लागेल. ते काही शक्य नाही. कितीही रडलो ह्यांच्या समोर तरी हे ऐकणाऱ्यातले नाही. त्या पेक्षा ३ महिने वेळ खूप आहे. मस्त क्रिकेट शिकून घेऊ आणि ह्यांना हरवलं की झालं तीन वर्ष कर भरावाच नाही लागणार. आपण सगळे लहान पणी पासून विट्टी दांडू खेळतं मोठे झालो आहोत. क्रिकेट काय अवघड आहे. अस्स हरवू ह्यांना आणि कर माफ करून घेऊ.
पाहिलं परिस्थिती एकचं, प्रॉब्लेम एकचं, व्यथा एकचं पण विचार पूर्णपणे वेगळे. तुम्ही प्रॉब्लेम आल्यावर कुठे असतात गावातल्या लोकांच्या जागेवर का भुवनच्या जागेवर, स्वतः तपासून बघा.
हे विचार येतात कुठून?
खूप जणांना वाटतं लीडरशिप ही जन्मतः येणारी गोष्ट आहे. पण लीडरशिप खरं आपण कुठून शिकतो? ह्याच उत्तर गोष्टींमधे येतं. लहानपणी कोणाकडून तरी आपण असं ऐकलेलं असतं की, तो राजा इतका शूर वीर होता की शत्रू घाबरून पळून जात होते किंवा त्या लाकूडतोड्याच्या प्रामाणिकपणामुळे देवी इतकी खुश झाली की तिने सोन्याची, चांदीची आणि लोखंडाची अश्या तिन्ही कुह्राडी लाकूडतोड्याला देऊन टाकल्या. हे असं ऐकलं की आपण मनातल्या मनात कुठे तरी ठरवतो मी पण त्या राजा सारखा शूर वीर बनणार, मी पण लाकूडतोड्या सारखा प्रामाणिक बनणार.
गोष्टींमधून शिकवणं हा आपल्या भारतीय संस्कृती मधला एक फार मोठा भाग आहे. रामायण, महाभारत ह्या कथेमधून आपण इतकं काही शिकतो की अवघड अवघड गोष्टी सोप्या होऊन जातात. एकदा विचार करून बघा ना का बरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंनी, महाराजांच्या लहानपणी गोष्टी सांगण्यासाठी खास दोन व्यक्ती नेमले होते?
गोष्टींमधून आपण घडतो. कोणीतरी ती राम कथा लहानपणी अशी सांगितली पाहिजे की कितीही संकट आले तरी मी रामासारखा शांत राहून माझं माझं कर्तव्य करेन हे मनात कोरल गेलं पाहिजे. म्हणून रामायण तर वाचाच पण अश्या कथा, सिरियल्स, फिल्म्स, नाटक, बघा ज्याच्या मधे जो कोणी हिरो आहे तो मेहनत करून शेवटी जिंकतो हे दाखवलं असेल. आज नाही तर उद्या हळू हळू तुम्हाला पण संकटं आल्यावर जिंकण्याच्या दिशेने होणाऱ्या मार्गाचा विचार करणं आणि तसं वागून जिंकणं सोप्प होईल.
हा लीडरशिप लेसन फ्रॉम लगानचा पहिला भाग आहे. भुवन ने सांगून तर दिलं की मी पैज स्वीकारतो आणि आपण क्रिकेट खेळू पण गावातले सगळे त्याला एका दिवसात हो म्हणाले का? नाही त्या नंतर तर खऱ्या अडचणी सुरु झाल्या. तो एकटा आपण जिंकू शकतो, मी बरोबर केलं, केला हा विचार करत होता आणि बाकीचे भुवन ने त्याच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक केली असा विचार करतं होते. मग पुढे काय झालं? त्याने सगळ्यांच्या विचारांना एकत्र कसं केलं. हे समजून घेऊ.
व्यथा आली की त्याला संधी समजून बघायचं हे समजलं पण आता पुढे काय? त्याने काय केलं? मी काय करू शकेल? हे बोलूया पुढच्या पत्रात.
तो पर्यंत सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आवडीच्या फिल्म्स बघण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.🙏🙏🙏
---------------------------------------------------------------------------------
हे पत्र वाचून जर तुमच्या चेहऱ्यावर हास्य आलं असेल किंवा तुम्हाला "अरे ह्याची गरज होती रे मला" असं वाटलं असेल तर ही जी छान वाटणारी फिलिंग आहे ना ती स्वतः पुरती का ठेवायची? करून टाका फॉरवर्ड आपल्या काही खास मित्र आणि मैत्रिणींना. पिझ्झा चा शेवटचा त्रिकोणी तुकडा कसा आपण सगळे शेअर करून खातो तसा हा प्रकार आहे. तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला असं पत्र वाचून नक्कीच छान वाटेल.
हे असे छान कमी वेळात वाचता येणारे, माझी वाचनाची आवड हळू हळू वाढवणारे, मला काही तरी शिकवणारे, पत्र प्रत्येक रविवारी मिळावे असं वाटतं असेल तर तुम्ही इथे whatsapp ग्रुप ला जॉईन करू शकता. 👉 Thougts Become Things Whatsapp Update Channel
जर तुम्हाला वाटतं असेल की अरे whatsapp वर फार गर्दी असते आपण शांत पणे कंप्युटर किंवा लॅपटॉप वर वाचूया तर 👉 तुम्ही आमच्या ई-मेल Newsletter ला सबस्क्राईब करू शकता.
माझं पत्र वाचल्याबद्दल आणि माझे पत्र खूप खूप लोकांपर्यंत पोहचवून माझे अनऑफिशीयल पार्टनर बनल्याबद्दल आपले खूप खूप आभार. भेटूया पुढच्या पत्रात. 😊😊😊
0 Comments