दुसऱ्यांची रेषा पुसावी का आपली रेषा मोठी करावी?

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष, 

          आला आहे रविवार आणि पुन्हा एकदा माझ्या डोक्यात काही तरी आलेलं तुमच्या डोक्यात टाकण्यासाठी मी हे पत्र लिहितो आहे. आपण ऐकलं आहे ना ऊर्जा निर्माण करता येतं नाही नष्ट करता येतं नाही फक्त एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकते. हेच काम माझं पत्र करतं. माझ्या डोक्यात कुठून तरी ऊर्जा येते (कुठून तरी म्हणजे वाचन, लिहिणं, बघणं, ऐकणं, चिंतन) ती ऊर्जा थोड्या प्रमाणात मी तुम्हाला पाठवतो. 

            मागच्या आठवड्यात महावतार नरसिम्हा चित्रपट पहिल्या नंतरची ऊर्जा तर अजूनही कायम आहे. ती का कायम आहे? का परत परत मी त्याच चित्रपटाबद्दल लिहितो आहे? हे सगळं बोलूया आजच्या पत्रात. लेट्स गो!

वाचण्याचा कंटाळा आहे का? तर हे पत्र तुम्ही इथे ऐकून समजून घेऊ शकता ते पण थोडक्यात. 

मराठी पत्राचा सारांश थोडक्यात ऐका 👈

        And my dear friend, if you are not familiar with the Marathi language, I just used an AI tool to convert this letter into an English audio summary. You can listen to it here. Technology is getting better, and I make full use of it.

Listen to the English Summary of this Blog 👈 

प्रेझेन्ट करण्याची म्हणजेच सादरीकरणाची कला 

            मी लहान पणापासून खूप सारे मारामारी चे चित्रपट बघत बघत मोठा झालो आहे. प्रत्येक प्रकारची मारामारी मी बघायचो आणि ती कशा पद्धतीने बनवली गेली आहे ते समजून घेणे हे माझ्या आवडीचं कामं झालं. कारण जेंव्हा एखादा चित्रपट बनवला जातो तेंव्हा फाईट कोरिओग्राफी नावाचा एक वेगळा विषय असतो. जसा जसा मी मोठा व्हायला लागलो आपल्या सगळ्या जुन्या वेगवेगळ्या ग्रंथामधे, कथांमधे भरपूर मारामारी आहे हे मी वाचलं. संघर्ष करून काही मिळवायचं असेल तर युद्ध होणारचं. उगीच एका गालात मारली की दुसरा गाल पुढे करा. समोरच्याला लाज वाटेल, ह्या असल्या मताचा मी नाही. मी हे नक्कीच मानतो की शक्य तितका युद्ध न होण्याचा प्रयत्न करावा पण गरज पडलीच तर मग छत्रपती शिवाजी महाराजचं आठवलेच पाहिजे. एकदम कापा कापी आणि पूर्ण गनिमी कावा.

        पण गडबड कुठे झाली मी जेंव्हा जेंव्हा फाइट्स असणारे चित्रपट पाहिले ते कधीही भारतीय नव्हते. असलेच तर इतकीच खोटी खोटी मारामारी असायची की अगदी भिशुम भिशुम चा आवाज यायचा. बरं रामायण, महाभारत या सिरियल्स बघाव्या तर त्या मधे तुम्हाला पण आठवतं असेल धनुष्य बाण मारायचे मंत्र बोलून की एका बाणाचे दहा बाण होणार. मग समोरचा एक बाण मारणार. ते बाण एक मेकांना धडकणारं. हे सगळं जरी खरं असेल, आपण आदर करावा त्या काळी असलेल्या विद्यांचा, असं असेल तरीही माझ्या मनाला लहानपणी फक्त हसू येतं होतं. असं कधी असतं का म्हणून?


            सहाजीकच मी मोठा होतं होतं कसे भारताच्या बाहेरचे चित्रपट, कथा ह्या चांगल्या, आपल्या कडचं रटाळ आणि कंटाळवाणं या मताचा झालो.  

इथे चूक माझी नाही 

        इथे चूक माझी किंवा माझ्या सारख्या लहान मुलांची नाही. चूक उत्कृष्ट पणे सादरीकरण करायला न जमणे  ही आहे. मी उदाहरणं सांगतो. सुपर हिरो आणि सुपर पॉवर हा विषय निघाला की आपण काय म्हणतो हनुमान हे सगळ्यात पहिले सुपरमॅन आहेत. हनुमान उडतात हे बघून बाहेरच्या देशातल्या लोकांनी सुपरमॅन बनवला. हनुमानाकडे गदा आहे हे बघून त्यांनी थॉर नावाचा एक सुपरहिरो बनवला त्याच्या हातात गदे च्या ऐवजी एक हतोडा दिला. चला मान्य केलं हनुमान पहिले सुपरहिरो आहेत. पण आज मी जर लहान मुलांना आवडीचा सुपरहिरो कोण विचारलं तर अगदी १-२ जण हनुमान म्हणतील बाकी सगळे स्पायडर-मॅन, बॅट-मॅन हेच उत्तरं देतील. 

        असं का? विचार केला तर समजेल सुपर मॅन, बॅटमॅन जरी मागच्या ८० वर्षातले असले तरी त्यांना तो कसा उत्कृष्ट पद्धतीने सादर केला पाहिजे, ही कला त्यांनी बरोबर शिकली आहे. आपल्या कडे आपण आपल्या सगळ्या कथा या आदरणीय आहेत, महान आहेत म्हणून मंदिरातच ठेवल्या. त्याचं पुन्हा एकदा सादरीकरण का राहून गेलं ह्याला करणं बरेच आहेत ते सोडून देऊ. पण नवीन जगात ज्या पद्धतीने आवडणारं त्या पद्धतीने (कुठेही मूळ कथेला धक्का लागू न देता) पुन्हा एकदा उत्कृष्ट सादरीकरण करणे हे आता महत्वाचं झालं आहे. 

        नीट विचार करा माझ्या सांगण्याच्या, मुलांना आपल्या ग्रंथातले श्लोक पाठ होतं नाही आणि चित्रपटांची गाणी सगळी च्या सगळी म्युझिक सोबत पाठ असतात हा फरक एका कारणामुळे आहे ज्याला उत्कृष सादरीकरण म्हणतात. उत्कृष्ट गोष्ट पण रटाळ पणे सांगता येते आणि फालतू गोष्ट पण फार रस भरून भरून सांगता येते. प्रश्न गोष्ट काय आहे हा नाही सादरीकरणाचा आहे. 

इथे महावतार नरसिम्हा जिंकला

        जरी हा चित्रपट ऍनिमेटेड असला तरी तो इतक्या छान पद्धतीने मांडला आहे की तो कुठेही लहान मुलांसाठी असलेला चित्रपट वाटतं नाही. एखाद्या मोठ्या व्यक्तीलाही "प्रल्हाद हा नामस्मरण करून करून किती महान बनू शकला. आपण पण आज पासून सुरु करूया." हे वाटायला लावण्या पर्यंत ह्या चित्रपटाने उडी मारली आहे. म्युझिक, ऍनिमेशन, डायलॉग, व्ही एफ एक्स वापरून कशा आपल्या सगळ्या कथा ह्या परत एकदा मांडाव्या ह्याच उत्कृष्ट उदाहरण म्हणजे नरसिम्हा चित्रपट आहे.

        हेच माझ्या मधला लहान मुलगा लहान पणापासून शोधतं होता आणि ते जसं मिळालं मी त्या बद्दल सांगणं थांबवू शकलो नाही. का बरं दासबोध समर्थ रामदास सांगत आहेत आणि कल्याण स्वामी लिहून घेतं आहेत असा कधी व्हिडिओ बनला नाही? का कधी ज्ञानेश्वर माउलींच्या ओव्या समजावून सांगणारे लहान मुलांना आवडणारे व्हिडिओ बनले नाही? का बरं शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची लढाई अशी काही दाखवली की एखाद्या चित्रपटा मधली ५ मिनिटांची लढाई बघून मला सगळे शिवरायांचे ८-१०  चित्रपट सलग बसून बघावे वाटले? का बरं तुकाराम महाराजांचे काही अभंग पुन्हा एकदा बनवून भरपूर लोक प्रिय केले गेले?

        मी जरी असे प्रश्न विचारात असलो तरी आपल्या कडे एखाद्या धर्माला, विचारसरणीला धरून चित्रपट बनवणं किती अवघड आहे हे मला चांगलंच माहिती. पुन्हा त्यात पैसे लावणे तितके पैसे कमवणे हा बिझनेस चा पण भाग आला. जरी एक चित्रपट बनला अगदी मी म्हणतो आहे तसा, पण त्याने पाहिजे तसे पैसे नाही कमावले तर पुन्हा कोणीही प्रयत्न करणार नाही. आवड नसली तरी या कारणासाठी तरी तुम्ही हा चित्रपट बघून या आणि अजून १० जणांना सांगा कारण असेच पुढचे महावतार सिनेमॅटिक युनिव्हर्स चे परशुराम, महावतार रघुनंदन, महावतार द्वारकाधीश चित्रपट येणार आहेत.

मला म्हणायचं काय आहे!

        मला म्हणायचं इतकंच आहे की आपल्याला आपले सगळे ग्रंथ, पोथ्या, पुराण, गोष्टी, श्लोक, ओव्या सगळ्या उत्कृष्ट पद्धतीने नवीन बघणाऱ्यांना आवडेल अशा पद्धतीने मांडत रहावे लागणारंच आहेत. तुम्ही जर काही नव्याने बनवण्याच्या भूमिकेत नसाल तर जे उत्कृष्ट पद्धतीने मांडत आहेत त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यत्न पोहोचवण्याच्या भूमिकेत या. 

        कोणीतरी दुसऱ्या कल्पना, गोष्टी, संस्कृती, वेशभूषा, भाषा घेऊन येतो आहे त्याला फक्त विरोध करणे ही कधी जिंकण्याची नीती असू शकत नाही. आपण आपल्या कडे असणाऱ्या गोष्टी जरी उत्कृष्ट पद्धतीने मांडू शकतो तरी सहज जिंकता येईल हे पक्क असू द्या. दुसऱ्यांची रेषा पुसण्यापेक्षा आपली रेषा मोठा करायला जास्त वेळ दिला पाहिजे हे माझं ठाम मत आहे.

        तुम्हाला पण वाटतं असेल की हो मला आपल्या जुन्या गोष्टी नवीन पद्धतीने मांडणाऱ्या या टीम मधे नक्की सहभाग घ्यायला आवडेल तर मला नक्की कळवा. भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि भारतीय कथा, गोष्टी, ग्रंथ ह्या सगळ्यांचा अभ्यास करण्यात व्यस्थ रहा. धन्यवाद. 

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा





 

Post a Comment

1 Comments

  1. छोट्या दोस्ता ,
    अनेक आशीर्वाद.
    उठल्याबरोबर तुझे पत्र आले आहे का ते पाहिले. नव्हतं तिथे म्हणून जरा नाराज झाले.यातच तुझं यशाचं गमक आहे. खूप मोठा भावार्थ तू सार्थ शब्दात अन् सोप्या पद्धतीने सांगतोस. ही सर्वात मोठी कठीण गोष्ट आहे.असाच खूप मोठा हो.खूप साऱ्या शुभेच्छा, सदिच्छा अन् आशीष तुझ्या साठी.
    तुझी ,

    भावनाताई.

    ReplyDelete