मंगल मूर्ती मोरया!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        आजचा रविवार खास आहे कारण हा आला आहे गणपती उत्सवाच्या मधे. मी जेंव्हा आपण काहीतरी लिहून, रेकॉर्ड करून इंटरनेट वर अपलोड करणं सुरु करूया हा विचार केला आणि ते काम करण्याची सुरवात केली तो दिवस म्हणजे २०२१ च्या गणेश चतुर्थीचा. त्या दिवशीपासून आज माझ्या प्रत्येक पत्राला तुमच्या सगळ्यांचे मस्त रिप्लाय हा प्रवास फार खास आहे. गणेश चतुर्थीला मला त्या दिवसाची आठवण आल्या शिवाय रहात नाही.

        आज प्रत्येकाच्या खिशात इंटरनेट आहे पण प्रत्येकाला त्याचा वापर स्वतःच्या आणि आपल्या ओळखीच्या सगळ्यांच्या फायद्यासाठी कसा करावा हे अजूनही समजणं बाकी आहे. ते जर समजलं ना तर समजा गणपती बाप्पांनी आशीर्वाद दिला. तोच आशीर्वाद कसा मिळतो ते समजून घेऊया विश्रांती घेऊन.

        विश्रांती घेऊन कसं काय काही मिळवता येतं? असा प्रश्न आला असेल तुम्हाला पण तेच सगळं आज बोलूया. लेट्स गो!

झोपणे म्हणजे विश्रांती नाही 

        आपल्या सगळ्यांना विश्रांती म्हणजे एकच माहिती. मस्त पांघरून घायचं, AC लावायचा, वातावरण थंड असेल तर अजूनच आनंद, मऊ मऊ गादी शोधायची आणि काय सांगावं पुढे. सगळ्यांनी विचार करून घेतला असेल काय करायचं पुढे त्याचा. 

        पण मी या विश्रांती बद्दल बोलत नाहीये. मला खरं तर गरजेपेक्षा जास्त झोपणे हे कंटाळवाणं वाटतं. "का बरं आवडतं असेल कोणाला झोपणं?" हे मला न मिळालेल्या उत्तरांपैकी एक आहे. जर तुमचं म्हणणं असेल की नाही तू चुकीचं बोलतो आहे. झोपेशिवाय काहीच होऊ शकतं नाही. रात्री झोप झाली तरच विश्रांती होते. माणूस फ्रेश होतो. एकदा माझं म्हणणं ऐकून तर घ्या! मी झोपेची गरज नाही हे म्हणतच नाहीये. ज्याची जितकी गरज तितकी झोप त्याने घ्यावी. गरजेपेक्षा जास्त घेऊ नये हे मी म्हणतो आहे. 

    आणि राहिला प्रश्न झोपेमुळे माणूस फ्रेश होण्याचा, सकाळी सगळे उठतात का आनंदाने? खरं तर आपण उठलो ह्यातच जगाचा सगळ्यात मोठा आनंद आहे. पण मला तरी असे खूप जण माहिती आहेत जे सकाळी रडत, कटकट करत, नाराजीने उठतात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळे. 

सकाळी उठल्यावर हसू येण्याची सोप्पी ट्रीक, 
स्वतःचा चेहरा आरश्यात बघा.

मग नेमकी विश्रांती म्हणजे काय?

        माझ्या मते "विचारांचा बदल" म्हणजे विश्रांती. बाकी रात्रीची झोप, दुपारची झोप वगरे तर सगळं आहेच. पण माणूस एका विचारातून दुसऱ्या विचारात गेला की एकदम फ्रेश झालेला असतो. ती खरी विश्रांती असते. हीच विश्रांती आपल्याला गणपती उत्सवात मिळते म्हणून तर हा सगळ्यांच्याच आवडीचा उत्सव आहे. 

        एखाद्याला आवड असते डेकोरेशनची, तो रोज-रोज नाही करू शकतं डेकोरेशन. रोज तेच ऑफिस, तेच काम आणि गणपती बाप्पा येणारं म्हणलं की असं डोकं चालायला लागतं. हे करू, ते करू, या वर्षी थीम करू, ह्या वर्षी देखावा करू, ह्या वर्षी लाईट लावू, ह्या वर्षी गणपती अशा आकाराचा घेऊ. बघा झाले ना वेगळे वेगळे विचार सुरु. झाली की विश्रांती मनाची. हे झालं डेकोरेशनच. ज्यांना डान्स आवडतो ते खुश, ज्यांना गायला आवडतं ते तर अजून खुश, संगीत खुर्ची, पाककला, रांगोळी, गाण्याच्या भेंड्या, महा-प्रसाद, आरती, ढोल, ताशा, मिरवणूक काय काय सांगावं. विचारच विचार आणि रोजच्या विचारांमधून एक बदल म्हणजेच विश्रांती. 

        हीच तर मज्जा आहे गणपती बाप्पांची. गणपती देवता ही आकलन करून देणारी देवता आहे. म्हणून हा उत्सव आपल्याकडे भरपूर उत्साह आणि नवीन विचार घेऊन येतो. 

ही विश्रांती दहाच दिवस का घ्यावी?

        मला लहानपणापासून गणपती उत्सव साजरे करत करत काय समजलं सांगू का? आपण रोजच्या विचारांपेक्षा वेगळ्या विचारांना भेटू तर फ्रेश राहू. मग हे दहाच दिवस का करायचं? रोज आपण नवीन नवीन काहीतरी करू शकतो ना? समजा रोज ऑफिस ला जातात तुम्ही तर ऑफिस चा काहीही संबंध नसलेला एखादा क्लास लावा. शाळा आणि रोज रोज अभ्यास करून कंटाळा आला आहे का मग शाळेचा संबंध नसलेल काहीतरी शिका. चित्रपट बघणे, पुस्तक वाचणे ह्या मधे का लोकं रमतात कारण तो चित्रपट ते पुस्तक त्यांना वेगळ्या विचारांच्या प्रवासाला घेऊन जातात. 

        अरे हे जर इतकं सोप्प आहे मग सगळे का कंटाळलेले दिसतातं? ह्याचं मला सापडलेलं उत्तर सांगतो. "आळसु लागला पाठी, बुद्धी दे रघूनायका" हे समर्थ रामदासांनी त्यांच्या करुणाष्टकांमधे खूप सोप्प करून सांगितलं आहे.  आपल्याला आळस इतकाच त्रास देतो की आपल्या आवडीच्या गोष्टीही तो करू देतं नाही. समजा तुम्हाला गाणं शिकण्याची आवड आहे. पण ऑफिस मधून इतका थकून आलो आहे की गाण्याच्या क्लासला जावं नाही वाटतं हा विचार डोक्यात असेल तर एक समजून घ्या. त्या क्लास मुळेच खरी ऊर्जा मिळणार आहे. मित्रा झोपून जितका फ्रेश होणार नाही तितका एक तास गाणं शिकून होशील. 

        आज माझ्या ऑफिस  मधे कामाचा उत्साह जो असतो तो या लिखाणामुळे येतो आणि लिखाणाचा उत्साह ऑफिसच्या कामामुळे येतो कारण दोन्हीही अगदी वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून मी न चुकता रविवारी विश्रांती घेतो. तुम्हीही सुरु करा. जमेल तसं वेळ काढून वेगळ्या विचारांच्या प्रवासाला जा.

        गणपती उत्सवाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. या गणपती उत्सवात तुमच्या मधला आळस पळून जावा आणि तुम्हाला तुमची विश्रांतीची जागा सापडावी हीच माझी मनापासून इच्छा आहे. पुन्हा एकदा हे वाचता वाचता जोरात म्हणा, बाजूला बसलेल्या व्यक्ती ला तुम्ही वेडे वाटले तरी चालेल पण म्हणा "गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया."

        भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.  

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा











Post a Comment

5 Comments

  1. खुप छान साधि सरळ सोपि भाषा मनाला पटते👌👌👌👌👍🏻👍🏻

    ReplyDelete
  2. Thoughts Become Things
    या नावाला साजेसे पत्र हे आजच्या पत्राचे विशेष वैशिष्ट्य!!
    हनुमंताचे कार्य कौशल्य हा पत्राचा गाभा आहे.
    आपणही कोणाचे बिभीषण व्हावे हा एक दिव्य संदेश आहे तर आपले कार्य करताना आवश्यकता असल्यास चाणाक्षपणे इतरांकडील बिभीषण शोधावा नव्हे ओळखावा हे यशाचे सूत्र देखील अतिशय सहजतेने तू मांडले आहेस.
    यासाठीच समर्थ जे अफर्मेशन (स्वयं सूचना) किंवा मागणे मागतात त्यात ते म्हणतात :

    धूर्त कळा मज दे रे राम।
    अंतरपारखी दे रे राम
    बहुजन मैत्री दे रे राम।
    प्रसंग ओळखी दे रे राम।
    कोमळ वाचा दे रे राम।

    अजिंक्य मित्रा हनुमंताशी त्यांच्या सद्गुणांशी मैत्री का व कशी करावी जेणे करून आपला व्यवहार, प्रपंच नेटका होईल याबाबत चे तुझे पत्र नक्कीच अनुकरणीय आहे.
    श्रीराम समर्थ

    ReplyDelete
  3. अजिंक्य च्या पत्राचे उत्तर अनंताने अगदी अचूक शब्दात दिले आहे. हनुमंताचे अनुकरण करता येईल हे सद्बुद्धी रामाकडे मागूया.
    जय श्रीराम

    ReplyDelete
  4. उत्तम अतिउत्तम 👍👍

    ReplyDelete
  5. 100% Correct 👌👍🙏

    ReplyDelete