सोडून द्यावी अशी काही लक्षणं!

।।  श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

                काल आपण सगळ्यांनीच आपल्या आवडीच्या गणपती बाप्पांना थोडं हसत थोडं रडतं टाटा केला असेल. आता भेट पुढच्या वर्षी. दहा दिवसात गणपती बाप्पा खूप काही देऊन, शिकवून जातात. पुन्हा एकदा आपल्या इतक्या छान प्रतिक्रिया मिळाल्या म्हणून धन्यवाद आणि वेळात वेळ काढून तुम्ही वाचन करत आहात ही appreciate प्रशंसा करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून पुन्हा वेगळा धन्यवाद. 

श्वेता चावरे ह्यांनी उत्तम चित्र काढले आहे. 

             आज आपण समर्थ रामदासांनी त्यागार्थ म्हणजे सोडून देण्यासाठी काही लक्षण सांगितले आहेत त्या बद्दल बोलूया. लेट्स गो!

सोडून द्यावे म्हणून सांगतो आहे

            समर्थांनी मूर्ख लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण असे दोन फार छान समास लीहिले आहेत. एखादा ग्रंथ वाचण्याच्या आधीच त्याच्या मधे काय असेल असा अंदाज बरेच जण लावतात. पण हा चुकीचा समज करून जर दासबोध ग्रंथ हातात घेतलाच नाही तर ही त्या व्यक्तीची फार मोठी चूक असेल. बऱ्याच जणांना या ग्रंथा मधला मूर्खलक्षण हा समास वाचून माझ्या बद्दल इतकं कसं माहिती समर्थांना हे नक्की वाटू शकतं!

        दोन समास आहे मूर्ख लक्षण आणि पढत मूर्ख लक्षण नावाचे. मूर्ख म्हणजे चुकीच्या गोष्टीने मोहित झालेला, फॅसिनेट झालेला. पढत मूर्ख म्हणजे ज्याला चांगली समज आहे पण तरीही तो मुर्खा सारखा वागतो तो पढत मूर्ख. 

        मी पुढच्या काही पत्रात मूर्ख लक्षण समासा मधल्या ६९ ओव्या आणि पढत मूर्ख लक्षणांमधल्या ४१ ओव्या या पैकी मला आवडलेल्या (जोरात लागलेल्या पण म्हणू शकता) ओव्यांचा एक संग्रह करतो आहे. तो तुम्ही वाचा आणि आवडला तर मला सांगा.

पहिले बोलूया मूर्ख लक्षण समासाबद्दल 

            मूर्खपणा मी खूपदा केलेला आहे मला तो जाहीरपणे मान्य करण्यात लाज वाटतं नाही. मला लाज मूर्खपणा करून, त्या मधून काहीही न शिकता तोच मूर्खपणा परत करण्यामधे वाटते. ती वेळ अजून तरी आलेली नाही. पण मी मूर्ख लक्षण समास सहज वाचायला घेतला आणि मला वाटतं गेलं "अरे हे आधी माहिती असतं तर माझ्या कडून या एका प्रकारची चूक झाली नसती." म्हणून मग एक एक ओव्या करत सगळंच वाचत बसलो आणि आत्ता पण वाचतो आहे. 

        तर मूर्ख लक्षणांमधल्या काही ओव्या मी इथे खाली देतो आहे ज्या मला आजच्या जगात फार उपयोगातल्या आहेत असं वाटतं. त्या काही ओव्या आणि त्या ओव्यांचा मला आलेला अनुभव सांगतो.

ओवी क्रमांक ५४

सांडूनियां जगदीशा ⁠। मनुष्याचा मानी भर्वसा ⁠।

सार्थकेंविण वेंची वयसा ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠

        ईश्वरास सोडून जो मनुष्याचा भरवसा धरतो आणि मनुष्यजीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवितो, तो एक मूर्खच होय.  मी उदाहरणं देऊन सांगतो. काही दिवसांपूर्वी माझ्या एका मित्राची मांजर काही कारणाने मेली. पंधरा दिवसानंतर आमचं बोलणं सुरु होतं तेंव्हा त्याने मला ही घटना सांगितली. त्याचा खूप जीव होता मांजरीवर त्याला फार वाईट वाटलं असं तो सगळं सांगत होता. गप्पा मारताना एक विषय निघाला देव आपली मदत करतात या बद्दलचा.

        या विषयावर तो भयंकर चिडून मला म्हणाला, "आधी माझा थोडा तरी विश्वास होता पण आता काहीच राहिलेला नाही." माझा मित्र बऱ्याच वर्षांपासून नास्तिक आहे. मी म्हणालो, "तू गेला कसा देवा कडे? तुझा तर विश्वास नाही ना?" 

        तो म्हणाला, "नाही विश्वास, पण काहीच मार्ग उरला नाही. सगळ्या डॉक्टरांनी सगळं तपासलं पण काहीच फरक पडत नव्हता म्हणून गेलो आणि त्याने (देवाने) माझ्या मांजरीचे प्राण वाचवले नाही."

        मी म्हणालो, "देवाला अगदी बिझनेस च्या पातळी वर आणलं आहे तू पण चल मला जमेल तसं समजावून सांगतो. एक तर तू कधी देवाला मागच्या २० वर्षात भेटायला गेला आहेस असं मला वाटतं नाही. मंदिर सोड स्वतः ध्यान लावून मनामधे कोणीतरी आहे जो आपली नकळत मदत करतो ह्या वर सुद्धा तुझा विश्वास नाही. विश्वास नाही, ओळख नाही, कधी भेट नाही हे सगळं असतानाही तू बिझनेस डील करायला गेला. कशी होणार डील? तू मला अमुक दे मी तुला तमुक देतो असं बोलायला, समोरच्याने तुझं ऐकायला ओळख तर पाहिजे ना?"

         उद्या कुठलाही अनोळखी व्यक्ती तुझ्या कडे येऊन पैसे मागायला लागला तर? तू तर पैश्याच्याही वरची गोष्ट मागायला गेला होता. नाही मिळाली म्हणून समोरच्याला काय नावं ठेवतो.

        एक तर विश्वास नाही देवावर त्या पेक्षा जास्त विश्वास डॉक्टरांवर. डॉक्टरांना जमलं नाही म्हणून देवाकडे पळाला. हे त्याने मला सांगितल्यावर हीच ओवी मला आठवली. सार्थकेंविण वेंची वयसा म्हणजे मनुष्यजीवनाचे सार्थक न करता आयुष्य वाया घालवणे. ह्या सगळ्या मांजरीच्या प्रकारात त्याने एक महिना सहज घालवला. पण काय करावं तो चुकीच्या गोष्टीने मोहित झालेला होता ना. (त्याची मांजर मेली ह्याच दुःख मला पण आहे. मला दगड समजू नका. समजावून सांगायला प्रसंग वापरला बाकी काही नाही.)

            आता पुढचे सगळ्या मला आवडलेल्या ओव्या मी इतक्या उदाहरणासोबत नाही सांगणार. थोडक्यात लिहितो. पण आपल्या कडून एखादं काम बिनचूक व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर हा समास नक्की वाचा आणि अभ्यास करा. 

ओवी क्रमांक २२

औषध ने घे असोन वेथा ⁠। पथ्य न करी सर्वथा ⁠।

न मिळे आलिया पदार्था ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠

        एखादा रोग असूनही औषध घेत नाही व अजिबात पथ्य पाळत नाही व प्राप्त पदार्थांत संतोष मानीत नाही, तो एक मूर्खच होय. पहिले वाक्य तर समजण्यासारखे आहे. जर तुम्हाला कुठला आजार आहे, त्याचे काही औषध आहेत, काही पथ्य आहेत तर पहिला प्रेफरन्स त्याला दिला गेला पाहिजे. पण तसं न होता आनंद हा खाणं, जेवणं, जागा ह्या वर जाऊन पथ्य राहतं बाजूला आणि आपण एन्जॉय करण्यावर लक्ष देतो. झाले की नाही चुकीच्या गोष्टीवर मोहित. पुन्हा समर्थ सांगतात की प्राप्त परिस्थितीला तृप्त परिस्थिती समजून चला. हे जर समजलं नाही तर तुम्ही मूर्ख. 

ओवी क्रमांक ४१

जैसें जैसें करावें ⁠। तैसें तैसें पावावें ⁠।

हें जयास नेणवें ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠

जसे करावे तसे फळ मिळते, हे ज्याला कळत नाही, तोही मूर्खच समजावा.

ओवी क्रमांक ५५

संसारदुःखाचेनि गुणें ⁠। देवास गाळी देणें ⁠।

मैत्राचें बोले उणें ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠

        संसारात भोगाव्या लागणाऱ्या दुःखामुळे जो देवाला शिव्या देतो, आपल्या मित्रांचे दोष जो लोकांत उघड करून सांगतो, तो एक मूर्खच.

ओवी क्रमांक ६२

अतिताचा अंत पाहे ⁠। कुग्रामामधें राहे ⁠।

सर्वकाळ चिंता वाहे ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠

जो अतिथीला त्रास देतो, कुग्रामात राहातो व सदा सर्वदा चिंता करीत असतो, तो मूर्ख समजावा. 

ओवी क्रमांक ७१

आपण वाचीना कधीं ⁠। कोणास वाचावया नेदी ⁠।

बांधोन ठेवी बंदीं ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠ ७१ ⁠।⁠।

        जो आपण कधी ग्रंथ वाचत नाही किंवा दुसऱ्या कुणालाही वाचायला देत नाही, बासनात बांधून ठेवून देतो, तोही मूर्खच जाणावा.

शेवटी सांगायचं इतकंच!

            ही जी शेवटची ओवी लिहिलेली आहे ना तो मूर्खपणा माझ्याकडून होऊ नये म्हणून मी हे पत्र लिहितो आहे. पूर्ण ग्रंथ मी तुम्हाला वाचायला दिला तर तुम्ही किती वाचणार मला माहिती नाही पण एक एक ओवी अधून मधून मी पाठवत राहिलो तर नक्कीच थोडा थोडा इंटरेस्ट येईल दासबोधात. म्हणून मी दासबोध ग्रंथ बांधून न ठेवता माझ्या ओळखीच्या सगळ्यांसोबत एक एक ओव्या करत वाटण्याचा निर्णय घेतला आहे.

            तुम्ही मूर्खलक्षण समासामधल्या तुमच्या आवडीच्या (तुम्हाला जोरात लागलेल्या) ओव्या या पत्राच्या खाली कमेंट मधे किंवा तुम्ही whatsapp ग्रुप मधे आहात तर ग्रुप मधे पाठवू शकता. तितक्याच आपण ओव्यांच्या भेंड्या खेळू.

        भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या कामात व्यस्त रहा. धन्यवाद.  

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा

        










    

Post a Comment

3 Comments

  1. प्रिय अजिंक्य
    सस्नेह नमस्कार!
    आजच्या रविवारची सकाळ तू आमच्या समोर आरसा धरून करायला लावलीस त्याबद्दल धन्यवाद! मागे एका पत्रात तू लिहिले होते की सकाळी उठून आनंदी व्हायचे असेल किंवा हसायचे असेल तर स्वतःला आरश्यात पहा🥳😀 तेंव्हा ते बाह्य रूप पाहून खरेच हसू आले व आज तू तोच आरसा मूर्ख लक्षण समासाचा संदर्भ देऊन अंतर रूप पहाण्यासाठी दिला तेंव्हा देखील स्वतःवर हसू आले आणि हे हसू मात्र आत्मचिंतन करण्यास प्रवृत्त करून गेले..

    ईश्वर प्राप्ती हे मानवी जीवनाचे लक्ष्य आहे याचा पुरता विसर नक्कीच पडत असतो🤷🏻‍♂️.
    तसेच नित्य व्यवहारात होणाऱ्या चुका देखील समर्थांनी अचूक दाखवल्या आहेत त्या टाळून उत्तम व्यक्तिमत्त्व घडविण्यास या मार्गदर्शक ठरू शकतात याची जाणीव तुझ्या पत्रातून झाली.
    मांजरी चे उदाहरण वाचून
    मान जर (स्वतःचा अहंकार जोपासायचा) का???
    जर मान म्हणजे जर देवाला मान ले तर सुख आहे, यश आहे याचा उलगडा झाला.

    तुझे पत्र लिहिताना ते किशोर, तरुण, प्रौढ सर्वांना समजेल अशी भाषा,उदाहरणे, चित्र तू पत्रात देत असतोस याचा अनुभव आज पुन्हा आला.
    चि वेधस पुण्याहून आलेला आहे म्हणून नाश्ता करताना तो पत्र वाचत होता व बाकी परिवार ऐकत होतो त्यावेळी लाज कशाची वाटते?? हा जो मुद्दा तू पत्रात दिला आहेस (झालेली चूक सर्वां समोर मान्य करायला मी लाजत नाही तर झालेली चूक पुन्हा पुन्हा होते त्याची लाज वाटते) तो त्यांना व्यवस्थित कळाला!

    तुझ्या भाषेत मला लागलेल्या ओव्या ....🙃🙃

    जन्मला जयाचे उदरी। तयासी जो विरोध करी।सखी मानिली अंतुरी। तो एक मूर्ख। श्रीराम २-१-८

    अकारण हास्य करी।विवेक सांगता न धरी। जो बहुतांचा वैरी। तो येक मूर्ख।। श्रीराम १३

    घरी विवेक उमजे।आणी सभेमध्ये लाजे।शब्द बोलता निर्बुजे।तो येक मूर्ख। श्रीराम १८
    नायेके त्यासी सिकवी।वडिलांसी जाणीव दावी।जो आरजास गोवी। तो येक मूर्ख। श्रीराम २०

    आपणास जेथे मान।तेथे अखंड करी गमन।रक्षू नेणे मानाभिमान। तो येक मूर्ख।। श्रीराम २४

    घरींच्यावरी खाय दाढा।बाहेरी दीन बापुडा।ऐसा जो का वेडमूढा। तो येक मूर्ख।। श्रीराम २८

    बहुता दिवसांचे सेवक।त्यागून ठेवी आणिक।ज्याची सभा निर्नायक। तो येक मूर्ख। श्रीराम ५८

    अक्षरे गाळून वाची।का ते घाली पदरिची। निघा न करी पुस्तकाची। तो येक मूर्ख।। श्रीराम ७०

    अल्प अन्याय क्ष्मा न करी।सर्वकाळ धारकी धरी।जो विस्वासघात करी। तो येक मूर्ख।। श्रीराम ५६

    अजून बऱ्याच आहेत पण मग........
    असो!

    घरातील वडीलधाऱ्यांना शि. सा. नमस्कार. लहानांना आशीर्वाद.

    तुझा
    Endless

    ReplyDelete
    Replies
    1. उत्कृष्ट,अनमोल , अर्थपूर्ण
      प्रतिसाद

      Delete
  2. Khoop chaan Ajinkya Jay Shree Ram🙏🏻
    Aajche tujhe patra Aajila pan Vachun Dakhavle Tila khoop aavdale

    ReplyDelete