श्री रामांच्या immunityचे रहस्य काय?

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

       रविवार आला आणि मी पण आलो परत काही तरी गप्पा मारण्यासाठी. मागच्या आठवड्यात भीती बद्दल बोलणं झालं होतं आपलं. या आठवड्यात भीती वाटली की भारतात जी गोळी सहसा सगळे जण घेतात त्या बद्दल बोलूया. बरोबर ओळखलं तुम्ही पॅरासिटामॉल. घरा घरातलं नाव. कुठेही कोपऱ्यात गरज नसली तरी पडून असलेली ही गोळी आहे. 

        श्री राम चौदा वर्ष वनवासात होते. त्यांना कधी नसेल झाला का त्रास सर्दी, तापाचा. असा एक विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. त्यांना पॅरासिटामॉल कोणी दिली असेल का? तेच बोलूया सगळं आजच्या पत्रात. लेट्स गो!


इकडे ताप तिकडे पॅरासिटामॉल

        सध्या सगळीकडे पाऊस, ऊन, थंडी मग मधेच भरपूर पाऊस असं चमत्कारिक वातावरण झालं आहे. ऊन पडलं-ऊन पडलं म्हणायच्या आत पाऊस सुरु होतो. पाऊस गेला-गेला म्हणे पर्यंत ढग फुटी होते. काही सांगता येतं नाही. पण ह्या सगळ्या वातावरणात सगळ्यात जास्त कॉमन असणारे आजार जर आपण पाहिले तर ताप, सर्दी, खोकला, थंडी हे चालूच आहेत. 

        आता हे पॅरासिटामॉल चांगलं का वाईट हा पत्राचा विषय नाही. मी तर या मताचा आहे की फिट व्यक्तीला आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम असतात आणि आजारी व्यक्ती ला फक्त एकच प्रॉब्लेम असतो. "मी बरा कसा होणार या बद्दल चिंता." त्या मुळे गोळी घ्या, वाफ घ्या, आयुर्वैदिक औषध घ्या, होमियोपॅथी औषधं घ्या किंवा लाईफ स्टाईल बदला पण प्रत्येकाला फिट रहाता आलं पाहिजे. पाहिजे ती पद्धत वापरा. 

        मला प्रश्न इथे पडला. इतक्या निवांत आणि सुखदायक परिस्थितीत आपण रहातो आणि तरीही इतक्या छोट्या छोट्या वातावरण बदलाने आपल्याला त्रास होतो. तसे श्रीराम तर जंगलात राहिलेले आहेत, १४ वर्ष. या १४ वर्षात असा कुठला मेडिकल किट ह्या सगळ्यांनी सोबत ठेवला की ह्यांना कधी थंडी-ताप पण आला नाही. ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी मी रामायण वाचत आणि शोधत होतो की कुठे पॅरासिटामॉल चा उल्लेख आहे का?

आणि मला ती पॅरासिटामॉल सापडली

        रामायणात बालकांडात बाविसाव्या सर्गात विश्वामित्र, श्री राम आणि लक्ष्मणांना प्रिस्क्रिस्पशन लिहून देतात. (मी रामायणात पॅरासिटामॉल, प्रिस्क्रिस्पशन असे शब्द आजच्या जीवनाला सारखं वाटावं म्हणून लिहितो आहे.) आता त्या मधे पॅरासिटामॉल असा उल्लेख नाहीये. पण २ मंत्र विश्वामित्र श्री रामांना देतात असा उल्लेख आहे. त्या मंत्राचे नाव आहे बला आणि अतिबला. 

        आता इथे खाली संस्कृत मधला एक श्लोक मी लिहितो आहे आणि त्या श्लोकाचं आणि त्याच्या पुढच्या काही श्लोकांच मराठी भाषांतर जे माझ्याकडे उपलबद्ध असलेल्या रामायणात आहे ते मी जसं च्या तसं लिहितो आहे. तुम्ही दोन्हीही वाचा आणि माझी खात्री आहे हे वाचून झाल्यावर तुम्हाला पॅरासिटामॉल च्या आधी ह्या दोन गोळ्या बला आणि अतिबला घ्याव्या वाटतील.

मंत्रग्रामं गृहाण त्वं बलामतिबलां तथा |

न श्रमो न ज्वरो वा ते न रूपस्य विपर्ययः || १-२२-१२

        बला आणि अतिबला नामक हा मी जो मंत्र समुदाय तुला देतो तो तू घे. त्याच्या प्रभावाने तू कधीही थकणार नाहीस. चिंता लागणार नाही. ज्वर उत्पन्न होणार नाही. तुझे रूप बिघडणार नाही. कोणतीही विकृती उत्पन्न होणार नाही. तू निजलेला असताना किंवा असावधान असताना राक्षस तुजवर हल्ला करू शकणार नाहीत. या पृथीवर बाहूबलात तुझी बरोबरी करणारा दुसरा कोणीही नसेल. हे रघुनंदन रामा! या विद्यांचा, या मंत्रांचा अभ्यास केल्याने तिन्ही लोकात तुझ्यासारखा पराक्रमी कोणीच होणार नाही. हे निष्पाप रामा, सौभाग्य, चातुर्य, ज्ञान, बुद्धी यामध्ये आणि निर्णय शक्तीमध्ये तू अतुल्य होशील. या विद्या प्राप्त केल्यास म्हणजे तुझ्यासारखा अन्य कोणीही नसेल, कारण बला आणि अतिबला या विद्या सर्व ज्ञानाच्या जननी आहेत. यांचा अभ्यास केल्याने तुला तहान यांचा त्रास होणार नाही. सर्व जगाच्या रक्षणासाठी तू मजकडून या विज्ञांचे ग्रहण कर. यांच्या अध्ययनाने जगात तुझी मोठी कीर्ती होईल. या दोन्ही विद्या ब्रह्मदेवाच्या तेजस्विनी कन्या आहेत. 

मला काय समजलं ते सांगतो

        काही शब्द परत परत लिहिलेले आहेत असं जाणवलं. अभ्यास, अध्ययन हा उल्लेख परत परत येतो. याचा अर्थ त्यांनी डोकं दुखलं की ही गोळी घेऊन टाक असं काही सांगितलं नाही. त्यांनी अशी काही तरी पद्धत शिकवली ज्याने हे कुठले आजार आहेत ते दूर पळून जातील असं समजावून सांगितलं आणि त्याची प्रॅक्टिस करत रहा, अभ्यास करत रहा असेही ते सांगतात. आजही प्राणायाम करणारे, योग करणारे कितीतरी जण मला माहिती आहेत जे वयाच्या ८०-९० ला इतके फिट असतात की एखादा तरुण लाजेल.


        थोडक्यात काय तर लाइफस्टाइल मधे बदल ही फार मोठी गरज आहे. कदाचित हीच गरज समजावून सांगितली असेल का? ह्या सगळ्या महाकाव्यांचा आपण विचार करू तितके अर्थ निघतील. मला जो समजला तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. कदाचित एक सवय असेल वाचण्याची त्या सवयीचा तुम्ही इतका अभ्यास केला, इतकेदा अध्ययन केलं की तुम्ही चातुर्य, ज्ञान, बुद्धी यामध्ये आणि निर्णय शक्तीमध्ये अतुल्य व्हाल. मिळाली की तुम्हाला बला शक्ती. अजून एक उदाहरणं म्हणजे तुम्हाला रोज व्यायाम करण्याची सवय लागली. रोज ठरलेल्या वेळेला तुम्ही भरपूर व्यायाम केला आणि भरपूर शरीराला पाहिजे तसं अन्न दिलं की "या पृथीवर बाहूबलात तुमची बरोबरी करणारा दुसरा कोणीही नसेल. आली की अतिबला शक्ती तुमच्याकडे. 

        पॉईंट काय आहे एखादी गोष्ट, एखादी सवय, एखाद काम, तुम्ही अभ्यासपूर्वक नियमितपणे करत गेले की तुम्हाला सुद्धा बला आणि अतिबला शक्ती येतील. हे सगळं सांगण्याच्या मागे माझा हेतू इतकाच की जितक्या लवकर पॅरासिटामॉल आठवते त्याचं प्रमाणे असं काही तरी श्री रामांकडे होतं हे पण माहिती असू द्या. आज पासून जर औषधं, गोळ्या हा विषय निघाला की सध्याच्या मॉडर्न गोळ्यांच्या नावासोबत बला आणि अतिबला हे दोन नावं पण येऊ द्या. तितकीच मज्जा आणि आपल्या ग्रंथांबद्दल आवड निर्माण होण्याचा एक चान्स मिळू शकतो. 

        माझी बला आणि अतिबला शक्ती कुठली आहे सांगू? अगदी सोप्पी प्रत्येक आठवड्यात काहीतरी वाचनातून, बघण्यातून, अनुभवातून, अभ्यासातुन शिकवण काढणे आणि रविवारी माझ्या शब्दात, शक्य तितक्या सोप्प्या शब्दात मांडणे. अशी तुमचीही कुठली शक्ती असेल तर मला सांगा. 

आपण भेटूया पुढच्या पत्रात. तो पर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपल्या आपल्या बला आणि अतिबला शक्ती शोधण्यात व्यस्त रहा. धन्यवाद.

आमचे पत्र नियमित मिळावे अशी तुमची इच्छा असेल तर हा Whatsapp ग्रुप जॉईन करा.

आमचे पत्र ई-मेल वर मिळावे अशी इच्छा असेल तर Email Newsletter ला इथे जॉईन करा.











Post a Comment

0 Comments