।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
चला, अजून एक रविवार आला आणि आपल्या पत्रामधून गप्पा मारण्याचा वेळ झाला. मागील तीन आठवडे आपण सेल्फ-हेल्पची पुस्तके, त्यांमधील विचार आणि दासबोध या ग्रंथातील विचार—यांमध्ये कुठे कुठे साम्य सापडते, ते पाहिले. आजचा रविवार आणि पुढचा रविवार हाच विषय असेल. त्यानंतर आपण एका नवीन वर्षात प्रवेश करणार आहोत—२०२६. पाहूया! नवीन वर्षात काही तरी नवीन विषयांवर गप्पा मारू.
आज 7 Habits of Highly Effective People या पुस्तकातील दुसरी सवय (Habit) मला दासबोध ग्रंथामध्ये सापडली. ती आपण आज पाहूया. Let’s go!
जर मागचं पत्र वाचणं राहिलं असेल तर ही आहे लिंक. Where Self-Help Meets Dasbodh!
आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.
जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.
नवीन वर्ष म्हणजे नवीन Resolution
Resolution म्हणजे संकल्प. नवीन वर्षाच्या पहिल्या काही दिवसांत या resolutions चा सुळसुळाट असतो—फार तर फार एक महिना. नंतर गोष्टी बदलायला लागतात आणि आपण काही तरी ठाम निर्णय घेतला होता, हे आपल्याला पुढच्या वर्षीच आठवतं. असं नक्कीच तुमच्यापैकी प्रत्येकासोबत झालेलं असेल.
बऱ्याच जणांना हे लक्षातच येत नाही—आणि ते येणं फार महत्त्वाचं आहे. यावर उपाय काय? तर स्टीफन कोवे लिहितात: Begin with the End in Mind—शेवटचा विचार करूनच सुरुवात करा.
हे केलं नाही तर काय होतं, याचं अगदी जवळचं उदाहरण सांगतो.
नवीन वर्षात “मी व्यायाम करून फिट होणार” हा प्रत्येकाचा संकल्प असतो. त्या संकल्पासाठी जिम लावलं जातं, जिमसाठी कपडे आणले जातात, वेळा ठरवल्या जातात. आणि काही महिन्यांत ऑफिसचं काम वाढतं, एखादा नवीन प्रोजेक्ट मिळतो, थोडी सर्दी-खोकला होतो—आणि जिम बंद. मग ते परत सुरूच होत नाही.
मग काही जण डायलॉग मारतात,
“मला माहिती होतं माझ्याकडून वर्षभर होणार नाही, म्हणून मी तीन महिन्यांचीच फी भरली होती.”
काहीच अर्थ नाही या वाक्याचा.
शेवट बघून पहिलं पाऊल उचलावं
जर शेवटचा विचार करून म्हणजे मला व्यायाम करून नेमकं काय मिळवायचं आहे हा विचार करून "व्यायाम करायचा" निर्णय घेतला असता, तर असं झालंच नसतं. पण शेवटचा विचार करायचा कसा?
शेवटी मला पाहिजे काय?
फिट बॉडी—एक सुदृढ शरीर.
मला असं सुदृढ आणि सक्षम शरीर हवं आहे, जे बदलत्या वातावरणाशी, खाण्या-पिण्याच्या सवयींमधील बदलांशी, वाढत्या कामाच्या ताणाशी आणि अनपेक्षित अडचणींशी सहज जुळवून घेईल. दररोज ७–८ तासांची पुरेशी झोप, गरज असल्यास योग्य औषधे किंवा पूरक गोळ्या आणि नियमित व्यायाम—यांच्या आधारावर हे शरीर मला उरलेल्या संपूर्ण दिवसभरात काम करताना आनंदी, प्रसन्न आणि ऊर्जावान ठेवेल असं हवं.
हे शरीर मिळवण्यासाठी जिम हा एकमेव मार्ग आहे का? नाही.
शरीर सुदृढ ठेवण्याची पहिली पायरी म्हणजे—बिनकामाचं शरीरात टाकणं बंद करणं. म्हणजेच पौष्टिक आहार. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे झोप. कितीही व्यायाम केला तरी झोप पूर्ण नसेल, तर व्यायामाचे फायदे कमी आणि नुकसान जास्त होतं. तिसरा भाग म्हणजे व्यायाम.
हा व्यायाम जिममध्येच करावा लागतो का? नाही. व्यायामाचा एकच नियम आहे—तो नियमित असावा.
घरी सूर्यनमस्कार करा—तेही चालेल.
रोज अर्धा तास चाला—तेही चालेल.
योगासन करा, फारच उत्तम.
मी तर म्हणतो, गाणी लावून घाम येईपर्यंत डान्स करा—तेही चालेल.
पण सगळे अवयव हलले पाहिजेत, सगळे मसल्स ताणले गेले पाहिजेत. न ताणल्यामुळे, एका जागी बसून राहिल्यामुळे ते घट्ट होतात आणि मग त्रास सुरू होतो.
हे सगळं झालं की आपण फिट!
अजून काय पाहिजे?
जर तुमचा गोल वेगळा असेल, तर त्यासाठी वेगळी मेहनत लागेल. पण ३६५ दिवस उत्साही, आनंदी आणि सुदृढ राहण्यासाठी हे पुरेसं आहे.
आता पाहूया समर्थ काय सांगत आहेत
समर्थ आपल्याला हेच समजावून सांगत आहेत.
-
दीर्घसूचना म्हणजे long-term planning
-
अखंड चाळणा म्हणजे सतत चांगलं काय, वाईट काय याची तपासणी
-
आणि पुढे काय होणार आहे, याचं अनुमान आधीच करून ठेवणं
“मला २०२६ मध्ये फिट बनायचं आहे” हा वरवरचा विचार झाला. पण दीर्घसूचनेने विचार केला, तर फिट म्हणजे नेमकं काय? ते मिळवण्यासाठी माझ्या सध्याच्या रोजच्या आयुष्यात मी काय बदल करू शकतो? काय करावं लागेल? काय सोडावं लागेल?
हे सगळं दीर्घसूचनेत येतं.
म्हणूनच long-term planning न करणारे लोक पटकन जिम लावतात आणि पटकन सोडून देतात. दीर्घसूचनेने विचार करणारे लोक रोज २० मिनिटं घरच्या घरी व्यायाम करून टाम-टूम राहतात—कुठल्या गोळ्या नाहीत, पथ्य नाही, काहीच नाही.
पण जर शेवट वेगळा असेल—उदा. तुम्ही एखाद्या स्पोर्ट्समध्ये असाल, कला क्षेत्रात असाल, किंवा खरोखरच जास्त फिट राहण्याची गरज असेल—तर हे २० मिनिटांचं गणित पुरेसं ठरणार नाही. तेव्हा व्यायामाचा वेळ वेगळा, अन्न वेळेवर आणि मोजून खाणं, असे बरेच बदल करावे लागतील. पण हे ही सगळं शेवटाचा विचार केल्यावरच समजतं.
म्हणूनच समर्थ म्हणतात—दीर्घसूचना पाहिजे. वरवरचा विचार नको.
एक सीक्रेट सांगू का?
खूप जण मला विचारतात—“तू दर रविवारी न चुकता पत्र कसं पाठवतोस?”
उत्तर एकच आहे—मला समर्थांची ही ओवी समजली आहे.
ती ओवी तुम्हालाही समजली, तर विचार करा—काय काय करता येईल?
आजपासूनच सुरुवात करा—long-term planning, म्हणजेच दीर्घसूचना.
पुढच्या रविवारी?
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया—एक शेवटचा लेखक समर्थांना भेटायला येत आहे. त्याच्या समर्थांसोबतच्या गप्पा पाहूया आणि मग भेटूया पुढच्या वर्षात—नवीन विषय, नवीन गप्पा घेऊन.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा
तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि long-term plan करून, सगळ्या विचारांची चाळणा करत तुमची अनुमानं प्रत्यक्षात आणण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद.

0 Comments