।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
अजून एक रविवार आणि मी नेहमीप्रमाणे तुमच्याशी गप्पा मारायला आलेलो आहे. दर आठवड्याला रविवारी येणाऱ्या माझ्या या पत्रांना तुम्ही जे प्रतिसाद देतात म्हणून प्रत्येकाचे मनापासून आभार. वेळ काढून तुम्ही मला रिप्लाय करता, हे पत्र पुढे शेअर करता आणि पोस्टमन बनून ते व्यक्ती-व्यक्तींपर्यंत पोहोचवता — यासाठी खास धन्यवाद.
मागच्या आठवड्यात मी एक चित्रपट पाहिला. तो मला इतका आवडला की आज मला त्याबद्दल बोलावं वाटलं. चित्रपटाचं नाव आहे क्रांतीज्योती विद्यालय. चला तर मग, सुरुवात करूया. लेट्स गो!
आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.
जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.
मराठी चित्रपटांची गोष्टच वेगळी आहे.
चित्रपट म्हणजे आपल्या भाषेत पिच्चर. आणि पिच्चर बघणं हा भारतीयांचा जिव्हाळ्याचा छंदच आहे. मागच्या काही वर्षांत OTT मुळे आपण फक्त हिंदी नाही, तर जगातल्या जवळजवळ सगळ्या भाषांमधले चित्रपट पाहू लागलो. त्यामुळे तुलना आपोआप सुरू होते.
हॉलिवूडमध्ये भन्नाट टेक्नॉलॉजी असते. साऊथच्या सिनेमांत एका बुक्क्यात माणसं आकाशात उडतात. हिंदी सिनेमांत गाणी-नाच मनसोक्त असतात. कन्नड सिनेमांत एक वेगळीच धार जाणवते. प्रत्येक इंडस्ट्रीची आपापली खासियत आहे.
पण या सगळ्या गर्दीत मराठी चित्रपट काहीतरी वेगळंच करतो. तो मोठ्याने ओरडत नाही; तो शांतपणे बोलतो. आपली संस्कृती ही गोष्टी ऐकण्यात रमणारी आहे, आणि मराठी सिनेमा ही गोष्ट सांगण्याची परंपरा आजही जपतो. पण तो फक्त गोष्ट सांगून थांबत नाही. गोष्ट सांगताना गंमत, संवेदनशीलता आणि शेवटी एक ठाम बोध देतो.
आजकाल चित्रपट पाहताना आपण आधी विचारतो —
“कलेक्शन किती?”
“पहिल्या आठवड्यात किती कमावलं?”
जणू चित्रपट नाही, शेअर मार्केटचा रिपोर्ट बघतोय.
पण खरं सांगायचं तर सिनेमा पाहायचा असतो; हिशोब मांडायचा नसतो. मराठी चित्रपट बहुतेक वेळा हळू बोलतो, मोठ्या आवाजात स्वतःची जाहिरात करत नाही. म्हणून तो बॉक्स ऑफिसच्या आरडाओरडीत कधी कधी ऐकूच येत नाही. पण एकदा तो आवडला की तो थेट मनात घर करतो. आणि तेव्हा कलेक्शन महत्त्वाचं राहत नाही; महत्त्वाचं राहतं ते — “हे पाहिलंच पाहिजे” असं दुसऱ्याला सांगावंसं वाटणं.
हा चित्रपट बघितलाच पाहिजे!
मलाही तसंच वाटलं, म्हणून आजच्या पत्राचा विषय एकच आहे — क्रांतीज्योती विद्यालय (मराठी माध्यम).
हा चित्रपट का बघावा, याची सुरुवात मी करतो लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्यापासून. हेमंत ढोमे या व्यक्तीला मराठी प्रेक्षक समजतो. त्यामुळे उत्तम लेखक आणि दिग्दर्शक असण्याबरोबरच, ते माणसं ओळखणारे कलाकार आहेत असं मला वाटतं. मराठीतील माझ्या आवडत्या लेखक-दिग्दर्शकांपैकी हेमंत ढोमे एक आहेत.
पोस्टरवर दिसणारे सगळे कलाकार उत्तमच आहेत. त्यांनी “चांगलं काम केलं” असं लिहिणं म्हणजे त्यांच्या कामाचा अपमान करण्यासारखं आहे. महत्वाच्या भूमिकांमधील प्रत्येकाने आपापली भूमिका अतिशय प्रामाणिकपणे साकारली आहे.
मला मुख्य भूमिका सोडून इतर भूमिकांबद्दल विशेष बोलावंसं वाटतं.
प्राजक्ता कोळी यांच्या आईच्या भूमिकेत असलेल्या चिन्मयी सुर्वे यांचं काम मला विशेष आवडलं. त्याचबरोबर साईराज केंद्रे नावाचा एक छोटा मुलगा आहे. फक्त ४-५ दृश्यं आहेत, पण प्रत्येक सीन लक्षात राहणारा आहे.
धनंजय सरदेशपांडे यांनी शाळेतील शिपायाच्या भूमिकेत जे काम केलं आहे, ते पाहण्यासारखं आहे. अमेय वाघच्या बायको च काम करणारी नटी आणि खलनायकाच्या भूमिकेत असणारे अनंत जोग तर फारच कमाल एक्टिंग करतात.
संपूर्ण चित्रपट अतिशय सुंदर शूट केलेला आहे. स्क्रीनवर दिसणाऱ्या जागा पाहिल्या की लगेच तिथे फिरायला जावंसं वाटतं. संगीतही तितकंच साजेसं आहे, मनात बसणारं.
खीर काही प्रसंग इतके छान लिहिलेले आहेत की आपली शाळा आठवून डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही. आपल्या शाळेतल्या सगळ्या आठवणी ताज्या होतात. शाळेतले शिपाई काका, वर्ग, फळा, खडू, शिक्षक, शाळेत मिळालेला मार शाळेचं मैदान, शाळेच्या बाहेर बोरं, पेरू विकणारे काका किंवा आजी अजून खूप काही आठवून जातं.
एक प्रसंग जो खूप बोलका आहे
चित्रपटात अमेय वाघ यांचा पहिली-दुसरीतला मुलगा एका इंग्रजी शब्दाचा अर्थ विचारायला येतो. अमेय — म्हणजे त्याचे बाबा — तो अर्थ त्याला त्याच्या मातृभाषेत, म्हणजे आग्री भाषेत समजावून सांगतात. आणि मुलाला तो लगेच समजतो.
तेव्हा अमेय म्हणतो,
“ह्याच्या शाळेत जाऊन एकदा सांगायला पाहिजे. सोपी गोष्ट अवघड करणं म्हणजे शिक्षण नाही; अवघड गोष्ट सोपी करणे म्हणजे शिक्षण.”
किती खरी गोष्ट आहे!
आज आपल्या आजूबाजूला इंटरनॅशनल बोर्ड, केम्ब्रिज बोर्ड, नवनवीन बोर्ड्स येत आहेत. येणं हा प्रश्न नाही. पण त्याबरोबर मराठी माध्यम बिनकामाचं आहे, मराठी भाषेला अर्थ नाही — असा गैरसमज हळूहळू तयार होत चालला आहे.
हा चित्रपट कुठेही बोट दाखवत नाही; पण शांतपणे आपल्याला समजावतो —
मराठी माध्यम संपलं, तर काही वर्षांनी मराठी भाषा उरणार नाही.
इतर भाषा शिकायलाच हव्यात. पण इंग्रजी येतं म्हणजे फार काहीतरी मोठं येतं, आणि इंग्रजी येत नाही म्हणजे काहीच येत नाही — हा गैरसमज अजूनही दूर करण्याची गरज आहे.
शेवटी मला म्हणायचं इतकचं आहे!
क्रांतीज्योती विद्यालय हा चित्रपट फक्त पाहायचा नाही; तो अनुभवायचा आहे. हा सिनेमा शिकवायला बसत नाही, पण पाहून झाल्यावर तो आपल्याला विचार करायला भाग पाडतो. आपल्या भाषेबद्दल, आपल्या शिक्षणाबद्दल आणि आपल्या निवडींबद्दल.
थिएटरमधून बाहेर पडताना “चित्रपट कसा होता?” यापेक्षा “मराठी भाषा कुठे थांबली आहे?” हा प्रश्न मनात राहतो — आणि तोच या चित्रपटाचं खरं यश आहे.
म्हणून जास्त विचार करू नका. रिव्ह्यू शोधत बसू नका. ट्रेलर पुन्हा-पुन्हा पाहू नका.
सरळ तिकीट बुक करा.
कारण असे चित्रपट बॉक्स ऑफिससाठी नसतात; ते आपल्या मनासाठी असतात.
आणि असे चित्रपट वेळेत पाहिले नाहीत, तर उद्या आपणच म्हणतो —
“असे चांगले मराठी चित्रपट आता का होत नाहीत?”
या चित्रपटामधलं मला एक गाणं फार आवडलं जे खरं तर एक जुनं बालगीत आहे. हे गीत नुकतंच माझ्या लहान मुलाच्या शाळेत शिकवलं आणि मी काही दिवसात इंटरनेट वर ऐकलं. मी ते गाणं पेटी वर वाजवलं आहे. हा आहे व्हिडिओ. आवडलं तर सांगा मला पेटी वाजवता येती का नाही ते!
पुढच्या रविवारी?
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा
भेटूया पुढच्या पत्रात.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा —
आणि क्रांतीज्योती चित्रपट बघण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद 🙏


0 Comments