गणपती बाप्पांचं वेगळं रूप!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        पुन्हा एकदा रविवार आणि पुन्हा एकदा आपल्या गप्पा. मी आज असं समजून बोलतो की तुम्ही क्रांतीज्योती विद्यालय  मराठी माध्यम हा चित्रपट पहिला असेल. नसेल पाहिला तर अजूनही असेल थिएटरला तर बघून या. 

        नेहमीप्रमाणे सगळ्यां वाचकांना खास धन्यवाद. या वेळेस तर तुमच्या, मी वाजवलेल्या पेटीबद्दल इतक्या प्रतिक्रिया आल्या की या पत्रात  पण मी शेवटी एक गाणं वाजवलं आहे पेटीवर. पोस्टमन बनून माझे पत्र भरपूर लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्ल खास आभार.

        मी पेटी वाजवायला कधी शिकलेलो नाही. मग तुम्ही म्हणालं की कशी काय तू पेटीवर गाणे वाजवतो? तेच बोलूया आजच्या पत्रात. लेट्स गो!

अवघड फक्त भरपूर प्रॅस्टिसच्या आधी असतं! नंतर?

मी एक सांगू का? —मला पेटी वाजवता येत नाही.

१२ वर्षांपूर्वी मी थोडा काळ गाण्याच्या क्लासला जायचो. तेव्हा पेटी पाहिली होती. सा, रे, ग, म काय असतं हे कळलं होतं. पण त्यानंतर ना प्रॅक्टिस, ना सराव. मला एकच गोष्ट माहिती आहे. सगळी गाणी सात स्वरात असतात.

        मागच्या पत्रात मला "क्रांतीज्योती विद्यालय" या चित्रपटाबद्दल बोलायचं होतं.  फक्त “हा चित्रपट चांगला आहे” असं लिहिण्यापेक्षा पेटीवर गाणं वाजवून व्हिडिओ टाकला, तर कदाचित अजून लोकांना चित्रपट बघायची इच्छा होईल. असा विचार मी केला, म्हणून दोन दिवस प्रॅक्टिस केली, पेटीवर गाणं वाजवायला शिकलो आणि व्हिडिओ बनवला.

        तुमच्या सगळ्यांचे रिप्लाय वाचून माझ्या लक्षात आलं की तुम्हाला मी बऱ्याच वर्षांपासून पेटी वाजवत आहे असा गैरसमज झाला आहे. माझा पेटीचा सराव नाही पण एखादी गोष्ट करायची ठरवली, तर—

  • शांतपणे ऐकणे 
  • अनेक वेळा बघणे 
  • शंभर वेळा ऐकणे
  • शंभर वेळा प्रॅक्टिस करणे

आणि जमेपर्यंत प्रयत्न करणे. हा सराव मला नक्कीच आहे. 

पेटी नाही शिकलो पण, प्रयत्न करणं शिकलो!

        मी गणपती बाप्पाला परत परत नमस्कार करतो आणि तुम्हीही करावा म्हणून सांगतो आहे. का करावा परत परत नमस्कार?  कारण मला एक गोष्ट खूप आधीच समजली ती म्हणजे —प्रसन्न राहून प्रयत्न केला की गोष्टी जमतात.

आपल्याला गणपती बाप्पा म्हटलं की काय आठवतं?
मोठे कान, सोंड, पोट, लहान डोळे… बघितलं की प्रसन्न वाटणारी मूर्ती.

पण मला गणपती बाप्पा म्हटलं की काय आठवतं माहिती आहे? “समजणे.” "Understanding" 

        आपण म्हणतो ना, गणपती ही बुद्धीची देवता आहे. मला असं वाटतं की गणपती म्हणजे समजण्याची शक्ती. मूर्ती थोडी बाजूला ठेवूया—आज गणपती बाप्पांचं वेगळा रूप ते म्हणजे "समजणं" समजणे म्हणजे गणपती बाप्पा.

    एकच वाक्य वेगवेगळ्या व्यक्तींनी ऐकलं तरी प्रत्येक जण वेगळा अर्थ घेतो. ह्यालाच गणपती बाप्पा म्हणतात.  एक वाक्य "जसं आहे तसं" समजणं, "चुकीचं समजणं" आणि "भलतंच काही तरी समजणं", म्हणजेच गणपती बाप्पा. त्याची इच्छा असल्या शिवाय आपल्याला काहीही समजत नाही. त्यामुळे रोज काहीही करा पण गणपती बाप्पाना नमस्कार केलाच पाहिजे या मताचा मी आहे. 

    कल्लौ चंडीविनायेकौ। हा समर्थांचा दासबोधामधला शब्द आहे. सध्याच्या भाषेत सांगितलं तर कलियुगात देवी (चंडी) व गणेशाची उपासना करावी, असे शास्त्र सांगते.

यत्न तो देव जाणावा.

        समर्थांनी ज्या प्रकारे कलियुगात गणेशाची उपासना करा सांगितलं त्याच प्रमाणे ते यत्न तो देव जाणावा हे पण म्हणतात. प्रयत्न म्हणजेच देव आहे असं त्यांचं म्हणणं आहे.

        प्रयत्न सगळेच करतात पण बऱ्याच जणांना मी कुठे गडबड करताना पाहिलं आहे माहिती का? ते प्रयत्न वैतागून करतात. करा की एन्जॉय. आता गणपती बाप्पा ची इच्छा असेल तर तुम्हाला समजेल प्रयत्न म्हणजेच देव. मी म्हणालो ना वाक्य सोप्प आहे पण अर्थ प्रत्येकाला समजेलच असं नाही. 

        पण ज्यांना समजलं आहे त्यांच्या साठी बोलतो. आता समजलं ना प्रयत्न म्हणजे देव मग झालं देवासमोर किंवा देवासोबत काम करताना कटकट करणार का? ठरलं आहे ना प्रयत्न करायचे झालं मग. मी प्रसन्न राहून प्रयत्न करण्यात माझी झीज झाली तरी चालेल पण मी प्रयत्न करेन हे लक्षात राहू द्या. 

          जसा मी मागच्या आठवड्यात पेटी वर एक गाणं वाजवण्याचा प्रयत्न मी केला तसाच प्रयत्न मी परत एकदा प्रसन्न राहून गणपती बाप्पांचं गाणं पेटी वर वाजवलं. हे पण ऐका आणि गणपती बाप्पांची थोडीशी वेगळी ओळख कशी वाटली ते मला नक्की सांगा. हे गाणं मी माझ्या मनात मी घडवलेल्या "समजणे" या गणपती बाप्पांसाठी वाजवलं आहे. भेटूया पुढच्या पत्रात.

        हे मी पेटी वर वाजवलेलं गाणं ऐकून गणपती बाप्पा तुम्हाला नक्कीच एखाद्या गोष्टीच्या "समजणे" या रूपात भेटतील आणि तुम्हीही प्रसन्न राहून भरपूर प्रयत्न करून आपले ध्येय नक्की मिळवणार ही मला खात्री आहे. 


तो पर्यन्त स्वस्थ रहा, मस्त रहा आणि प्रसन्न राहून प्रयत्न करण्यात व्यस्त रहा. धन्यवाद. 

पुढच्या रविवारी?

पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया. 

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

धन्यवाद 🙏


Post a Comment

14 Comments

  1. Appreciate your efforts 👏👏

    ReplyDelete
  2. Samir Satish Mahimkar18 January 2026 at 11:54

    खरच खूप छान सांगितली आहे तुम्ही ही बाप्पा ची गोष्ट. तुमच्या मताला मी १००% सहमत आहे. प्रयत्न करताना वैतागून केले जातात. सहनशीलता नसते. सर्व काही ताबडतोब हव असत.
    तुमचा ह्या गोष्टी मुळे नक्कीच माझा सारख्याची प्रयत्न करताना होणारी चिडचिड नक्कीच नाही होणार. चित्रपटाचा संदर्भ नक्कीच योग्य आहे. प्रयत्नांती परमेश्वर नक्कीच मिळतो.
    खुप छान. 🤞👌🏻👍🏻👏🙏🏻

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद दादा. नक्कीच आता तुम्ही प्रयत्न प्रसन्न राहून करणार हे ऐकून छान वाटलं. वाचत रहा आणि प्रत्येक रविवारी असेच कमेंट च्या निमित्ताने भेटतं रहा

      Delete
  3. लक्ष,ध्येय,सातत्य समोर ठेऊन चालल्यास
    अजिंक्य सारख यश नक्कीच मिळणार!

    ReplyDelete
    Replies
    1. माझ्या सारखं कशाला? मला जितकं मिळालं आहे त्या पेक्षा मोठं यश मिळेल.
      Thank You चित्रा मावशी. :)

      Delete
  4. Mast👍🏼👍🏼👏

    ReplyDelete
  5. Amazing!!!! प्रत्येक पत्रात एक नविन विचार मांडतो आहेस अजिंक्य. वाचायला खूप छान वाटतं. प्रयत्न हे प्रसन्न मनाने व्हावे....तू पत्रात म्हणालास तसं बरेच वेळा थोड्या नाराजीने कामं होतात हे प्रांजळपणे मान्य करते. आता या पुढे तुझा हा विचार आठवेल नक्की.

    ReplyDelete
    Replies
    1. हेच तर पाहिजे. हे पत्र फक्त निमित्त आहे.
      तुमचे या पुढचे सगळे प्रयत्न प्रसन्नतेने होणारच ह्याची खात्री आहे मला.
      धन्यवाद आरती ताई.

      Delete
  6. Vaishali Parvekar18 January 2026 at 11:55

    प्रयत्न करतो पण चिडून करतो हा स्वभावदोष सहज शब्दांत स्पष्ट केलं आणि पटले ते .. अजिंक्य खूप सुंदर विचार पेरतो त्या मुळे रविवार स्व चिंतनाचा झाला माझा

    ReplyDelete
    Replies
    1. स्व चिंतन हा फार मोठा विषय आहे.
      स्व चिंता जवळपास सगळे करतात पण स्व चिंतन केल्याने आपण स्वतःमधे बदल घडवून आणू शकतो.
      रविवारच्या पत्राचं निमित्त किंवा आठवड्यातला थोडा वेळ स्व चिंतनासाठी ठेवला तर या इतकं उत्तम काही नाही.
      धन्यवाद वैशाली ताई. 🙏

      Delete
  7. अजिंक्य एखादी आवडलेली गोष्ट लिहून काढणे, एखाद्या गोष्टीची प्रॅक्टिस करणे व ती प्रस्तुत करणे आणि तेही सातत्यपूर्ण उद्देशाने....,,!! दोन्ही रविवारचे ब्लॉग अतिशय छान आहेत विशेष म्हणजे ते स्वअनुभवातून संपन्न आहेत. मकर संक्रांतीच्या शुभेच्छा. असंच लिहित रहा...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सतीश सर. तुम्हाला ही संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.
      तुम्हाला जशी निसर्गासोबत गप्पा मारण्याची, निसर्गासोबत वेळ घालवण्याची आवड आहे तशी ही माझी लिहिण्याची आवड झाली आहे. कदाचित त्या मुळे सहज लिहून पाठवलं जातं. लिहिणं नेहमी सुरु राहील तुम्ही नेहमी वाचतं रहा. पुन्हा एकदा धन्यवाद.

      Delete