Where Self-Help Meets Dasbodh – Part 5

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        नवीन वर्षाच्या या पहिल्या पत्रात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. तुम्ही प्रत्येकजण माझ्या बडबडीला उत्तर देता, म्हणूनच ती बडबड “संभाषण” बनते. एकटा बोलणारा माणूस बडबडतो, पण त्याला कोणी उत्तर दिलं की ते संभाषण होतं. तुमचे रिप्लाय आले की मला जरा बरं वाटतं, कारण माझं बोलणं कुठेतरी पोहोचतंय असं वाटतं.

        आज आपण बोलणार आहोत प्रत्येकाच्या आवडीच्या, पण थोड्या दुर्लक्षित सवयीवर — खाण्याच्या सवयीवर. नवीन वर्ष सुरू झालं की वजन कमी-जास्त करायचा, फिट व्हायचा, हेल्दी राहायचा विचार जवळजवळ सगळ्यांच्याच मनात येतो. सेल्फ हेल्प सिरीज मधलं हे पाचवं पत्र आहे. बघूया सेल्फ-हेल्प लेखक आणि समर्थ एकच गोष्ट कशी वेगळ्या पद्धतीने सांगतात.  Let’s go.

जर मागचं पत्र वाचणं राहिलं असेल तर ही आहे लिंक. Where Self-Help Meets Dasbodh - Part 3!

आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.

जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.


वजन कमी किंवा जास्त करण्याचा गोल

        नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये वजन कमी किंवा वाढवणं हा गोल कायम टॉपवर असतो. आपल्याला वाटतं, यंदा नक्की बदल करू. पण मागच्या काही वर्षांत मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली — वजनाचा प्रश्न हा व्यायामापेक्षा जास्त खाण्याशी जोडलेला आहे. आपण काय खातो, कसं खातो आणि केव्हा खातो, यावरच सगळं अवलंबून आहे.

मागच्या वर्षी मला एक इंग्रजी वाक्य फार आवडलं —
“Abs are made in the kitchen, not in the gym.”
याचं आपल्या भाषेत सांगायचं तर,
“पोट व्यायामशाळेत नाही, तर स्वयंपाकघरात कमी होतं.”
खूप साधं आहे, पण खूप खोल आहे.

ह्या सगळ्या विचारांत मी दासबोध चाळत होतो. बाजूला काही इंग्रजी सेल्फ-हेल्प पुस्तकं होती आणि समोर भागवत ग्रंथ. या सगळ्यांमध्ये मला एक समान धागा दिसला — खाण्याच्या सवयी.

खाली मी जे लिहितो आहे ते थेट पुस्तकातील ओळी नाहीत, तर त्या लेखकांच्या विचारांचा माझा मतितार्थ आहे.

James Clear – Atomic Habits

जेम्स क्लिअर सांगतात की योग्य अन्न खाणं ही इच्छाशक्तीची गोष्ट नाही, तर सवयींची गोष्ट आहे. जे अन्न समोर असतं आणि सहज मिळतं, तेच आपण खातो. घरात चांगलं अन्न ठेवलं, की शरीर आणि सवय आपोआप सुधारते. अशी अन्ननिवड हळूहळू शिस्त आणि यश घडवते.

👉 चांगलं अन्न → चांगली सवय → यश


Robin Sharma – The 5 AM Club

रॉबिन शर्मा म्हणतात, शरीर ही एक यंत्रणा आहे. तिला जड, बनावट अन्न दिलं, तर विचार आणि ऊर्जा कमी होते. हलकं, स्वच्छ, वनस्पतीप्रधान अन्न खाल्लं, की मन स्पष्ट राहतं आणि कामात फोकस वाढतो.

👉 स्वच्छ अन्न → स्वच्छ विचार


Tony Robbins – Awaken the Giant Within

टोनी रॉबिन्स सांगतात की अन्न आपली मनःस्थिती ठरवतं. ताजं, नैसर्गिक, वनस्पतीआधारित अन्न ऊर्जा वाढवतं, तर जंक अन्न थकवतं. आहार बदलला, की आयुष्याची दिशा बदलते.

👉 अन्न बदला → आयुष्य बदला

थोडक्यात सांगायचं तर, चांगलं खाण्याचे फायदे हे फक्त आपल्याच घरात सांगितले जात नाहीत; जगभरचे मोठे लेखकही तेच वेगवेगळ्या शब्दांत सांगतात.


भागवत आणि दासबोधात काय सापडलं?

    भागवत ग्रंथात देवर्षी नारद मुनी कलियुगाचे दोष सांगतात. तिथे एक असा भावार्थ येतो की कलियुगात बहुतेक लोकं अन्न विकू लागतील. हा थेट शब्दशः अर्थ नाही, पण आजच्या काळाकडे पाहिलं तर तसं चित्र नक्की दिसतं.

    हे वाचून मला या आठवड्याच्या लिखाणाचा विषय मिळाला. एक अशी सवय जी इतकी सहज आपल्या आयुष्यात आली आहे की ती चूक आहे असंही वाटत नाही. उलट, आपण आनंदाने हॉटेल्सची जाहिरात करतो, मित्र-नातेवाईकांना बाहेर घेऊन जातो, मुलांना वेगवेगळ्या चवींची सवय लावतो. आणि हो, कोण कोण आहे ही जाहिरात  करण्यात पुढे असं  बोट दाखवायचं झालं तर माझा नंबर पहिलाच आहे. मी काही वेगळा नाही.


समर्थ काय सांगतात?

समर्थ रामदास स्वामी दासबोधात “खादाड” हा शब्द वारंवार वापरतात. मी आधी त्या ओव्या सांगतो. 

दशक २ समास १ 

 तपीळ खादाड आळसी ⁠। कुश्चीळ कुटीळ मानसीं ⁠। धारिष्ट नाहीं जयापासीं ⁠। तो येक मूर्ख ⁠।⁠।⁠ ३१ ⁠।⁠। 

 आळसी आणि खादाड ⁠। दुर्बळ आणी लाताड ⁠। तुटक आणी लाबाड ⁠। आतिशयेंसीं ⁠।⁠।⁠ ९ ⁠।⁠। 

 दशक ३ समास ६ 

 तोंतरें बोंबडें निर्बळ ⁠। रोगी कुरूप कुटीळ ⁠। मत्सरी खादाड तपीळ ⁠। या नांव आध्यात्मिक ⁠।⁠।⁠ ४४ ⁠।⁠। 

 दशक १२ समास ९ 

 दुर्बल नाचारी वोडगस्त ⁠। आळसी खादाड रिणगस्त ⁠। मूर्खपणें अवघें वेस्त ⁠। कांहींच नाहीं ⁠।⁠।⁠ १ ⁠।⁠।  


खादाड : फक्त खाणं नाही, तर न संपणारी हाव

    आपण “खादाड” म्हटलं की लगेच डोळ्यासमोर जास्त खाणारा माणूस येतो. पण दासबोधात खादाडपणा म्हणजे मर्यादेचा अभाव. फक्त अन्नातच नाही, तर इच्छा, भोग, मोबाईल, पैसा, प्रसिद्धी — सगळीकडे.

    कोणी माणूस सतत जंक फूड खातो आणि शरीर बिघडवतो — हा खादाडपणा दिसतो. पण तोच माणूस सतत मोबाईल पाहतो, गरजेपेक्षा जास्त खर्च करतो, सतत आणखी हवं असं म्हणतो — हाही खादाडपणाच आहे. जसं खराब अन्न पोट बिघडवतं, तसंच अति भोग मन आणि बुद्धी बिघडवतात.

म्हणूनच समर्थ खादाडपणाला आळस, दुर्बलता, मूर्खपणा याच्याशी जोडतात. कारण ज्याचं पोटावर नियंत्रण नाही, त्याचं मनावरही नसतं.  स्वच्छ अन्न, योग्य प्रमाण, योग्य वेळ. घरचं, साधं, पोटाला आणि मनाला हलकं वाटेल असं अन्न. जसं इंजिनमध्ये खराब इंधन टाकलं तर गाडी अडखळते, तसंच शरीरात अस्वच्छ अन्न गेलं की विचार आणि निर्णयशक्ती अडखळते.

        मला खादाड हा शब्द एक दोनदा दासबोध ग्रंथा मधे दिसला, नवीन वर्षाचे खाण्याचे, वजनाचे संकल्प, सेल्फ हेल्प ऑथर्स चे अन्नाबद्दल सांगणे, भागवत ग्रंथा मधे अन्ना बद्दल लिहिलेलं सापडणं. हे सगळं एकत्र आलं म्हणून आजचा विषय घेतला. पुढच्या पत्रात एक शेवटचे काही लेखक समर्थांना भेटायला येतं आहेत त्यांना ऐकुया.


शेवटी मला म्हणायचं इतकंच आहे!

    म्हणून २०२६ मध्ये वजन कमी-जास्त करण्याचा गोल ठेवणाऱ्या माझ्या सगळ्या मित्रांना मी एवढंच म्हणतो —
आपण सगळेच थोडेफार खादाड आहोत. मीही आहे. चला, हा खादाडपणा थोडा कमी करूया. योग्य, स्वच्छ, पौष्टिक अन्न खाऊया, त्याला व्यायामाची जोड देऊया आणि २०२६ मध्ये थोडं हलकं, थोडं शहाणं आणि थोडं अधिक निरोगी होऊया.

पुढच्या रविवारी?

        पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया— आपला दासबोध सेल्फ हेल्प पुस्तकांसोबत वाचण्याचा आणि त्या मधे कुठे साम्य सापडतं का हे शोधण्याचा प्रवासाचा शेवटचा आठवडा असेल.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—

👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

भेटूया पुढच्या पत्रात.
तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा —
आणि स्वयंपाकघरात राहून फिट होण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद 🙏




Post a Comment

3 Comments

  1. अन्न बदला आयुष्य बदला👍🏻

    ReplyDelete
  2. खुप महत्वाची गोष्ट सांगितली. खुप छान 👌👌👌🙏🙏

    ReplyDelete
  3. खूप छान अजिंक्य. खाण्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे, हि महत्वाची बाब तु सोप्याशब्दात मांडली आहेस,जय श्रीराम.🙏🙏

    ReplyDelete