कधीही डमरू वाजू शकतो…

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,

        मागच्या आठवड्यात आपण “मनाची गंमत आणि स्वसंवाद” यावर गप्पा मारल्या. गप्पा मारल्या म्हणजे तेच नेहमीचं – मी लिहिलं आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार रिप्लाय केला. रिप्लाय केला जरी नसेल, पण तरीही तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक वाचकाचे मनापासून धन्यवाद.

        पोस्टमनची भूमिका स्वीकारून माझे पत्र ज्याला गरज आहे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणाऱ्या प्रत्येक पोस्टमनला, म्हणजेच शेअर करणाऱ्या प्रत्येकाला, वेगळा नमस्कार आणि धन्यवाद.

आज महाशिवरात्री आहे. तर मग आज आपण भगवान शंकरांचीच एक गोष्ट ऐकूया. Let’s go!


मागचे पत्र वाचायचे राहिले असेल तर इथे क्लिक करून वाचू शकता – मनाची गंमत आणि स्वसंवादाची जादू

आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावे असे वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.

जुनी सगळी पत्रे वाचायची असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता – Thoughts Become Things.

Recommendation of the Week

भगवान शंकरांची गोष्ट सांगण्याआधी थोडा वेळ घेतो. कदाचित सगळ्यांना माहिती नसेल म्हणून हा छोटा परिच्छेद लिहित आहे.

        मी प्रत्येक आठवड्यात रविवारी रात्री ८ वाजता Zoom कॉलद्वारे लहान मुलांसोबत गप्पा मारतो. इंटरनेट संपूर्ण जगातील चांगल्या आणि वाईट माहितीने भरलेले आहे. जितकी माहितीची गरज नाही तितकी माहिती इंटरनेटवर आहे. “फोन बघू नको” असे सांगणारे पालक प्रत्येकाच्या घरात असतात. पण मी ठरवलं – “बघू नका” म्हणण्यापेक्षा इंटरनेटवर नेमकं काय उपयोगाचं आहे हे मुलांना शिकवू.

    रविवारी ८ वाजता कनेक्ट होऊन आम्ही भरपूर गप्पा मारतो. कधी कविता, कधी YouTube, कधी गोष्टी, कधी चित्र, कधी शॉर्ट फिल्म, कधी ऑनलाइन गेम्स – मागच्या २५ कॉल्समध्ये खूप काही केलं. अजूनही खूप काही शिकण्यासारखं आणि गप्पा मारण्यासारखं बाकी आहे.

    महत्त्वाचं म्हणजे फक्त लहान मुलांनीच यावं ही अट नाही. लहान म्हणजे फक्त वयाने नाही; तुम्ही मनाने लहान असाल आणि तुम्हाला कविता, गोष्टी, गप्पा आवडत असतील तर तुमचंही स्वागत आहे.

    रविवारी ४५ मिनिटे द्या आणि बघा कॉलमध्ये किती मजा असते ते. या कॉलला आम्ही “दादा सोबत गप्पा” असं नाव दिलं आहे. तुम्हालाही यायची इच्छा असेल तर WhatsApp समूहात जॉईन व्हा. रविवारी ८ वाजण्याच्या १५ मिनिटे आधी ID ग्रुपवर मिळेल.

शेतकरी आणि महादेवांची गोष्ट

    एकदा देवेंद्र इंद्र रागावले आणि त्यांनी जाहीर केले की पुढील बारा वर्षे पाऊस पडणार नाही. सगळे शेतकरी खूप चिंतेत पडले. त्यांनी खूप विनंती केली, तेव्हा सांगण्यात आले की भगवान शंकर डमरू वाजवतील तेव्हाच पाऊस पडेल, पण तेही बारा वर्षांनी.

हे ऐकून बहुतेक शेतकऱ्यांनी शेती करणे थांबवले. “जेव्हा पाऊसच नाही, तर मेहनत करून काय उपयोग?” असे त्यांना वाटले.

    पण एक शेतकरी मात्र रोज आपल्या शेतात जात राहिला. तो जमीन खणत होता, खत टाकत होता, बियाणे पेरत होता. इतर लोक त्याची थट्टा करायचे. त्यांनी विचारले, “पाऊस बारा वर्षांनी येणार आहे, मग एवढी मेहनत कशाला?”

    तो शेतकरी शांतपणे म्हणाला, “मला माहीत आहे की आत्ता पीक येणार नाही. पण जर मी बारा वर्षे शेतीच केली नाही, तर शेती कशी करायची हेच विसरेन. पाऊस आला की मी तयार असायला हवे. म्हणून मी ही मेहनत करत आहे आणि करत राहणार.”

    हे सर्व देवी पार्वती वरून पाहत होत्या. त्यांनी शेतकऱ्याचे शब्द ऐकले आणि घाईघाईने येऊन भगवान शंकरांना सांगितले, “जर तुम्हीही बारा वर्षे डमरू वाजवला नाही, तर तुम्हीही वाजवायचा विसराल.”

    आपल्याला माहिती आहे की भगवान शंकर भोळे आहेत. पार्वती देवींचे हे शब्द ऐकून भगवान शंकरांनी डमरू घेतला आणि सराव म्हणून वाजवला. लगेच पाऊस पडू लागला. ज्याने सराव सोडला नव्हता, त्या शेतकऱ्याच्या शेतात पहिले पीक आले.

    या गोष्टीतून आपल्याला एकच संदेश मिळतो — सराव कधीही सोडू नये. परिस्थिती कशीही असली तरी सातत्य ठेवणारा माणूसच योग्य वेळ आल्यावर यशस्वी होतो.

Deliberate Effort to Improve

    "A deliberate effort to improve performance will forge talent through thousands of hours of practice. Success has to do with deliberate effort or deliberate practice in a focused environment."

    वरची दोन वाक्ये मी Think Sucess पुस्तकातून जशीच्या तशी घेतली आहेत. ही गोष्टही मी याच पुस्तकात वाचली होती. काय लिहावं या रविवारी हा विचार करत करत मी Think Success वाचत होतो तेंव्हा ही गोष्ट मला आवडली आणि रविवार, महाशिवरात्र सगळं जुळून आलं.

    या पुस्तकाचे नाव आहे Think Success आणि लेखक आहेत सुशांत पठारे. जॉब किंवा बिझनेस या क्षेत्रात प्रत्येकाला यश हवे असते. ते कसे मिळवावे याबद्दल मार्गदर्शन करणारे हे चांगले पुस्तक आहे.

    आता प्रश्न तुमचा आणि माझा. या पत्राच्या निमित्ताने मी तुम्हाला विचारतो – अशी कोणती सवय किंवा मेहनत आहे जी तुम्ही काहीही झाले तरी सुरू ठेवणार आहात? व्यायाम असेल, वाचन असेल, गाणे ऐकणे किंवा म्हणणे असेल, बाग काम, कुठलीही सवय असेल नियमितपणे सुरु ठेवा. याबद्दल आज नक्की विचार करा. आणि कधी मन डगमगले तर आजच्या पत्रातील गोष्ट आठवा आणि स्वतःला सांगा – कधीही भगवान शंकर डमरू वाजवू शकतात.

पुढचा रविवार येईपर्यंत
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि प्रॅक्टिस करण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद 🙏
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा





Post a Comment

7 Comments

  1. Bhaskarrao Kundikar15 February 2026 at 15:51

    अजिंक्यजी, आपली साधी पण आकर्षक लेखन शैली, सहजपणे इतरांना त्यात गुंतवून ठेवण्याचे कसब वाचण्यासारखे आहे. मुळात आपली पत्रलेखनाची कल्पनाच भावली दर्जेदार व ज्ञानवर्धक लेखन वाचण्याची संधी प्राप्त करुन दिल्याबद्दल आपले व माझे स्नेही सतिशराव जोशी (संभाजी नगर) यांचेही मन:पूर्वक धन्यवाद 🙏

    ReplyDelete
  2. वाह खुप छान गोष्ट👌👌सातत्य ठेवणे हे खरच☑️

    ReplyDelete
  3. Nice narration 👍👍

    ReplyDelete
  4. Chan ahe jai poornwad🙏🏼

    ReplyDelete
  5. Sameer Satish Mahimkar15 February 2026 at 16:24

    प्रत्येक आठवडा एक खूप छान संदेश विचार देऊन जाणारा किंवा अस म्हणता येईल की अंतर्मनातल्या चांगुलपणा व सदविचारला जिवंत ठेवण्याचा जो उपक्रम आहे ना तो खूप सुंदर आहे.
    नवीन पिढीला ह्या वैचारिक बैठकीत येण्यासाठीचा गवाक्ष म्हणा,पण उपलब्ध करून देताय. ह्या विचाराने जुन ते सोन हे लक्षात यायला मदत होते.
    जुन्या पिढीला आपले विचार पुढच्या पिढीला योग्य रीत्या समजून सांगण्याचं कौशल्य ह्या पत्रांमधून होत आहे.
    असंच लिहीत रहा. खूप छान 👌🏻.
    👏👏👏👏👏

    प्रत्येक आठवड्यात प्रतिक्रिया द्यायला जमतच अस नाही. पण तुमचे विचार आम्ही (मी) नेहमी किमान स्वतः ला अपडेट ठेवण्यास नक्की वाचत असतो.

    ReplyDelete
  6. खूप छान 👍भगवान शंकर कधीही डमरू वाजवू शकतात त्यामुळे आपण तयारीतच पाहिजे हर हर महादेव 🙏

    ReplyDelete
  7. खुप छान.👌👌👌🙏🙏

    ReplyDelete