मनाची गंमत आणि स्वसंवादाची जादू

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार, विनंती विशेष,

        रविवार म्हणजे “अजिंक्यचे पत्र वाचण्याचा वार” असं तुम्ही आयुष्याचं गणित लावून घेतलं तरी चालेल. “मी काहीतरी लिहिलं आहे, वाचून बघ ना एकदा” असं ओळखीच्यांना सांगण्यापासून ते रविवारी येणारे तुमचे मस्त प्रतिसाद—हा प्रवास फारच सुंदर आहे. तुम्ही दुसरं काम बाजूला ठेवून वाचण्यासाठी वेळ देता, त्याबद्दल विशेष धन्यवाद.

आपण दिवसभरात स्वतःशी किती वेळा बोलतो, कधी विचार केलाय?
उठल्यापासून झोपेपर्यंत आपलं मन सतत काही ना काही बोलत असतं—कधी आनंद, कधी काळजी, कधी तुलना. आजच्या पत्रात आपण याच मनाची एक गंमत ऐकणार आहोत.

आजच्या पत्रात आपण आपल्या मनाची गंमत सांगणारी एक गोष्ट ऐकणार आहोत. मनाविषयी जितकं शिकवलं पाहिजे तितकं आपल्याला कधी शिकवलंच जात नाही. म्हणून मी शक्य तितकी मनावर उपलब्ध असलेली पुस्तकं वाचत असतो. चला, आज मी कुठलं पुस्तक वाचलं ते पाहूया. Let's go!

ह्या गोष्टीत नेमकं काय आहे ते पुढे बघूया!

सरश्री कोण आहेत?

सरश्री हे पुण्यातील एक ख्यातनाम आध्यात्मिक गुरु आणि लेखक आहेत. ते तेजज्ञान फाउंडेशनचे संस्थापक असून ‘आनंदी विचार’ (Happy Thoughts) पसरवण्याचं कार्य करतात. त्यांनी अध्यात्म, आत्ममदत आणि ध्यानावर १०० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत आणि ३००० हून अधिक प्रवचने दिली आहेत.

सरश्री यांचं “घुस्सा छू मंतर” हे पुस्तक मी आधी वाचलं होतं आणि त्यावर एक पत्रही लिहिलं होतं. घुस्सा छू मंतर ह्या पुस्तकाबद्दल लिहिलेले माझे पत्र तुम्ही इथे वाचू शकता. त्या पुस्तकापासूनच मला सरश्री यांची पुस्तकं वाचायला आवडायला लागली. त्यांच्या गोष्टी सांगण्याची आणि गोष्टींच्या आधाराने समजावून सांगण्याची पद्धत मला खूप आवडते.

आजच्या पत्रात मी सरश्री यांच्या “स्वसंवाद – एक जादू” या पुस्तकातील एक गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट सांगण्यामागचा माझा हेतू एकदम स्पष्ट आहे—तुम्ही हे पुस्तक विकत घ्यावं आणि वाचावं.

तुलना करणे म्हणजे दुःखाची बी पेरणे

    या आधी पण आपण सगळ्या पात्रांमधे तुलना करणे या बद्दल बरेचदा बोललो आहे. सोशल मीडिया मुळे तर तुलना इतकीच होतं असते. त्या मुळे या वर प्रत्येकाने आवर्जून लक्ष देऊन थोडा अभ्यास केला पाहिजे. स्वसंवाद एक जादू या पुस्तकामधली एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो ती वाचा आणि नक्की हे पुस्तक मागवा.

सर्व दुःखाचं मूळ म्हणजे माणसाचं मन! जे प्रत्येक क्षणी स्वसंवाद करत असतं. आपण आपल्या मनाला उठता-बसता, खाता-पिता, सकाळ-संध्याकाळ, दिवस-रात्र सतत बोलताना, तुलना करताना ऐकत असतो, बघत असतो. असं सतत तुलना करणारं तुलनात्मक मन जर निरोगी असेल, त्याचा सुसंवाद योग्य असेल, तर सर्व काही सुरळीत पार पडतं. 

    आपलं तुलनात्मक मन सतत वेगवेगळ्या गोष्टींशी तुलना करत असतं. त्याचा सतत स्व"कु"संवाद चालू असतो. असं मन सतत, प्रत्येक घटनेनंतर "हे चांगलं झालं, हे वाईट झालं, आता खूप दुःख होतंय, आता खूप आनंद होतोय' असा प्रकारची तुलना करत राहतं.

       असं मन क्षणिक मिळणाऱ्या लाभावर तात्पुरतं समाधानी होतं. आता मन आनंदात असेल, तर दुसऱ्याच क्षणी ते दुःखी होतं. जसं, एक शिक्षिका आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या संवादावरून आपल्या लक्षात येईल, की माणसाचं तुलना करणारं मन कशा प्रकारे चुकीच्या स्वसंवादात आणि चांगल्या वाईटाचा चक्रात अडकत जातं, फसत जातं.

"मुलांनो, पुढच्या आठवडयात आपण सगळे ट्रीपला जाणार आहोत." टीचरने असं सांगताच वर्गामध्ये जणू काही बॉम्बच फुटला. संपूर्ण वर्ग टाळ्या आणि हास्याच्या गडगडाटाने हादरला. 

"व्वाsव! मस्तच! खूप छान, क्या बात हे, वाहवा! किती मज्जा येईल!" अशा अनेक आवाजांनी वर्ग दुमदुमला. मात्र जसा टीचरने हात वर केला, तसा वर्गातील आवाज हळूहळू शांत होत गेला. 

"या, ट्रीपसाठी प्रत्येकाला ८०० रुपये खर्च येणार आहे." टीचरचं पुढचं वाक्य ऐकताच वर्ग चिडीचूप झाला. 

"बाप रे! ८०० रुपये? इतके जास्त?" एक मुलगी तोंडाचा आs करत म्हणाली.

"म्हणजे मला तर येताच येणार नाही." अतिशय नाराजीने एक मुलगा हळूच उद्गारला. 

"पण ८०० रुपये केव्हा, जर विमानाने जायचं असेल तर..." टिचरच्या चेहऱ्यावर बोलताना खट्याळ हसू होतं. त्या पुढे म्हणाल्या, "पण जर बसने जायचं असेल, तर केवळ दोनशे रुपये लागतील, म्हणून आपण बसने जातोय." 

हे वाक्य ऐकताच सर्व मुलांनी आपल्या जागेवर उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला, तर कुणी आपल्या जागेवरच नाचायला सुरवात केली. "अरे व्वा! बरं झालं आपण बसने चाललोय. त्यामुळे पैसेही वाचतील आणि उरलेल्या पैश्यातून खरेदीही करता येईल." 

"मस्त!....आपण तर ट्रीपला जाणारच." असे अनेक आवाज येऊ लागले. 

"आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार सर्व पर्यटन स्थळं गर्दीने गच्च भरलेली आहेत, त्यामुळे आपल्याला जागाच नाही."

"अरे रे! आमच्याच ट्रीपच्या वेळी असं का होतं?"

"पण आपल्याला जुहू बीचवर जागा मिळाली आहे." 

"अरे व्वा! ग्रेट! हे तर खूप छान झालं, मस्त खाऊ पिऊ मज्जा करू." 

"आपण नाष्ट्यासाठी साबुदाण्याची खिचडी बरोबर नेणार आहोत."

"ईssई......! साबुदाण्याची खिचडी! ट्रीपला जाण्यासाठी काय उपवास करावा लागतो का? अशी ट्रीप असते का कधी?"

"ज्यांना उपवास असेल त्यांनाच फक्त खिचडी, इतरांसाठी मस्त सूप आणि पुलाव असेल."

"अरे वाSSवा! क्या बात है. ही डिश तर फारच छान आहे. शिवाय, आमच्या आवडीचीच आहे."

"पण आपल्या बरोबर प्रिन्सिपॉल सुद्धा येणार आहेत."

"अरे रे! ट्रीपची सगळी मजाच घालवली!"

"पण ते फक्त बसपर्यंत सोडायला येणार आहेत."

"व्वा! मग तर काहीच हरकत नाही. ते गेल्यावर आमचंच राज्य, आम्ही मस्त मजा करू."

या गोष्टीतून आपल्याला काय लक्षात येतं?
एकाच घटनेवर माणसाचं तुलनात्मक मन क्षणात आनंद आणि क्षणात दुःख निर्माण करतं.

मनाला प्रत्येक गोष्टीवर “चांगलं” किंवा “वाईट” असा ठप्पा लावण्याची सवय असते. आणि हाच स्वसंवाद—हेच दुःखाचं मूळ कारण ठरतं.

आहे की नाही गंमत?

घटना आणि प्रसंग होतच राहणार. त्या प्रसंगामुळे मी आनंदी व्हायचं की दुःखी—हे माझा स्वसंवाद ठरवतो.

स्वसंवाद चांगला होण्यासाठी अनेक पद्धती आहेत—
“जे होतं ते चांगल्यासाठीच होतं” असा विचार,
“प्रारब्ध आहे, आनंदाने स्वीकारूया” अशी वृत्ती,
किंवा साधं “Take it easy”.

माझ्यासाठी स्वसंवाद सुधारण्याचं एक वाक्य खूप उपयोगी पडलं—
Happiness is a choice. You can choose happiness anytime, every time.

विचार करा—जगातलं सगळ्यात कष्टाचं कामही आपण आनंदाने, हसत हसत करू शकलो तर?

आज आपण भरपूर गप्पा मारल्या. आता गप्पा नको स्वसंवाद करूया. म्हणून आजचा छोटा प्रयोग:

आज दिवसभरात आपल्या मनाशी कसा स्वसंवाद होतो ते एकदा शांतपणे निरीक्षण करा. फक्त निरीक्षण करा—बदल करण्याचा प्रयत्नही करू नका.

पुढचा रविवार येईपर्यंत 
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि उत्कृष्ट स्वसंवाद करण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद 🙏

पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

Post a Comment

0 Comments