मला आणि देवाला दिसतं आहे!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        मागच्या रविवारी आपण देव कुठल्या मार्गावर सापडेल या विषयावर गप्पा मारल्या. त्याआधी गणपती बाप्पांचं वेगळं रूप पाहिलं आणि मराठी चित्रपटांबद्दल माझे काही विचार मांडले.
प्रत्येक आठवड्यातल्या या माझ्या बडबडीला तुम्ही गप्पा बनवता, छोटा का होईना पण रिप्लाय करता—यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.
पोस्टमनची भूमिका घेऊन माझी पत्रं तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणाऱ्यांना खास धन्यवाद.

आज मी एक गोष्ट सांगणार आहे.
अशी गोष्ट जी फक्त तुम्हाला आणि देवालाच माहिती आहे.
नेमकी कोणती?
चला तर मग—आजच्या पत्रात पाहूया. Let’s go!

मागच्या पत्राला इतक्या छान प्रतिक्रिया दिल्या तुम्ही मी प्रत्येकाला रिप्लाय लिहिला आहे. तुम्ही मी दिलेले सगळे रिप्लाय मागच्या रविवारचं पत्र आज उघडलं तर वाचू शकतात. 

मागचे पत्र वाचायचे राहिले असेल तर इथे क्लिक करून वाचू शकता या मार्गावर देव नक्की सापडेल! 

आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.

जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.


गोष्टी ऐकाव्या आणि सांगाव्या

गोष्टी आपल्याला जगायला शिकवतात.
नकळत आवडलेली आणि नकळतच मी करायला सुरुवात केलेली गोष्ट म्हणजे—गोष्टी सांगणे आणि गोष्टी ऐकणे.
मला समजत नाही, आठवत नाही तेंव्हापासून मला गोष्टी ऐकायला आणि सांगायला आवडतात.

या पत्रांची सुरुवातसुद्धा मला माहिती असलेल्या गोष्टी लिहून ठेवण्यापासूनच झाली आहे.
प्रत्येक रविवारी लिहायचं ठरवल्यावर काय लिहायचं? हा मोठा प्रश्न होता.
पण डोक्यात गोष्टींचा खजिना असल्यामुळे—काहीच सुचलं नाही तर आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी लिहायच्या, असा विचार केला.
कोणी वाचलं नाही तरी चालेल; माझ्या गोष्टींचा संग्रह तरी तयार होईल—इथपर्यंत मी गेलो होतो.

पण गोष्टी, आठवड्यातले अनुभव, काही आध्यात्मिक पुस्तकं आजच्या उदाहरणांसोबत लिहिणे, पुस्तकांची व चित्रपटांची थोडक्यात ओळख आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया—
असं करत करत या पत्रांचा प्रवास फार सुंदर पद्धतीने चालू आहे.

त्या “आपण गोष्टी लिहू” या दिवसाची आठवण ठेवत, आजसुद्धा मी वाचलेली एक गोष्ट सांगतो.
(सांगतो म्हणजे—मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार आहात.)


मला आणि देवाला दिसतं आहे

एकदा एक काका देवदर्शनासाठी मंदिरात जातात.
देवळाच्या आवारात एक मूर्तिकार सुरेख मूर्ती घडवत असतो. जवळच त्यांना तशीच एक पूर्ण झालेली मूर्ती दिसते.
दोन्ही मूर्ती अगदी सारख्या पाहून ते आश्चर्याने विचारतात,
“आपल्याला एकसारख्या दोन मूर्ती घडवायच्या आहेत का?”

मूर्तिकार म्हणतो,
“नाही. आम्हाला एकाच मूर्तीची गरज आहे. पण पहिली मूर्ती शेवटी खराब झाली, म्हणून दुसरी बनवतो आहे.”

काकांनी पहिली मूर्ती बारकाईने पाहिली.
त्यांना कुठलाही दोष दिसला नाही.
म्हणून त्यांनी विचारलं,
“कुठे आहे दोष? काय खराब झालं आहे?”

मूर्तिकार शांतपणे म्हणाला,
“मूर्तीच्या नाकावर एक बारीकसा ओरखडा आहे.”

काकांनी विचारलं,
“ही मूर्ती कुठे ठेवली जाणार आहे?”

मूर्तिकार म्हणाला,
“समोर सात मीटर उंच चबुतऱ्यावर.”

काका हसत म्हणाले,
“इतक्या उंचीवरून हा लहानसा ओरखडा कोणाला दिसणार आहे?”

त्यावर मूर्तिकार पटकन म्हणाला,
“सर, बाकी कोणाला दिसो वा न दिसो—मला आणि परमेश्वराला तो दिसतो आहे.”

काका काही न बोलता मंदिरात गेले.
पण मूर्तिकाराचं ते शेवटचं वाक्य त्यांच्या मनाला लागलं.
मंदिरात जाण्याआधी त्यांनी स्वतःच्या चपला नीट काढल्या आणि आजूबाजूला पडलेल्या इतर चपलाही नीट लावून मग आत गेले.


ओढ ही आतूनच असावी लागते

आपण केलेलं काम कोणाला कसं वाटतं यापेक्षा,
“मी माझं काम उत्कृष्टच करणार”
ही ओढ आतून असणं जास्त महत्त्वाचं आहे.

अशी प्रेरणा मिळणं म्हणजे खरंच भगवंताची कृपा.
ही प्रेरणा हवी असेल तर एकच उपाय आहे—
ज्यांनी उत्कृष्टता मिळवली आहे, त्यांची चरित्रं वाचा.

पण आज उलट चित्र आहे.
उत्कृष्ट सोडून फालतू पाहण्याची प्रेरणा वारंवार होते—
रिल्स, शॉर्ट्स, फालतू गाणी, स्टेटस…

बेंचमार्कच जर इतका खालचा असेल,
तर उत्कृष्टतेकडे बघायचं कशासाठी?

म्हणून आजच्या गोष्टीतून इतकंच लक्षात ठेऊया—
आपण जे काही करतो, ते कोणाला दिसतं की नाही,
कोणी पाहतं की नाही, या साठी नाही. 
मला उत्कृष्टच करायचं आहे कारण, मला आणि देवाला ते दिसतं आहे. 


आपण भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपलं काम उत्कृष्ट पद्धतीने करण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद 🙏


पुढच्या रविवारी?
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा 
👉 Email Newsletter Join करा







Post a Comment

0 Comments