।। श्री ।।
सप्रेम नमस्कार विनंती विशेष,
मागच्या रविवारी आपण देव कुठल्या मार्गावर सापडेल या विषयावर गप्पा मारल्या. त्याआधी गणपती बाप्पांचं वेगळं रूप पाहिलं आणि मराठी चित्रपटांबद्दल माझे काही विचार मांडले.
तुम्ही प्रत्येकजण माझ्या बडबडीला उत्तर देता, म्हणूनच ती बडबड “संभाषण” बनते, छोटा का होईना पण रिप्लाय करता—यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद.
पोस्टमनची भूमिका घेऊन माझी पत्रं तुमच्या जवळच्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणाऱ्यांना खास धन्यवाद.
आज मी एक गोष्ट सांगणार आहे.
अशी गोष्ट जी फक्त तुम्हाला आणि देवालाच माहिती आहे.
नेमकी कोणती?
चला तर मग—आजच्या पत्रात पाहूया. Let’s go!
आमचे पत्र दर आठवड्याला न चुकता मिळावं असं वाटत असेल तर Email Newsletter Subscribe करायला विसरू नका.
जुने सगळे पत्र वाचायचे असतील तर तुम्ही इथे क्लिक करू शकता. Thoughts Become Things.
गोष्टी ऐकाव्या आणि सांगाव्या
गोष्टी आपल्याला जगायला शिकवतात.
नकळत आवडलेली आणि नकळतच मी करायला सुरुवात केलेली गोष्ट म्हणजे—गोष्टी सांगणे आणि गोष्टी ऐकणे.
मला समजत नाही, आठवत नाही तेंव्हापासून मला गोष्टी ऐकायला आणि सांगायला आवडतात.
या पत्रांची सुरुवातसुद्धा मला माहिती असलेल्या गोष्टी लिहून ठेवण्यापासूनच झाली आहे.
प्रत्येक रविवारी लिहायचं ठरवल्यावर काय लिहायचं? हा मोठा प्रश्न होता.
पण डोक्यात गोष्टींचा खजिना असल्यामुळे—काहीच सुचलं नाही तर आपल्याला माहिती असलेल्या गोष्टी लिहायच्या, असा विचार केला.
कोणी वाचलं नाही तरी चालेल; माझ्या गोष्टींचा संग्रह तरी तयार होईल—इथपर्यंत मी गेलो होतो.
पण गोष्टी, आठवड्यातले अनुभव, काही आध्यात्मिक पुस्तकं आजच्या उदाहरणांसोबत लिहिणे, पुस्तकांची व चित्रपटांची थोडक्यात ओळख आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया—
असं करत करत या पत्रांचा प्रवास फार सुंदर पद्धतीने चालू आहे.
त्या “आपण गोष्टी लिहू” या दिवसाची आठवण ठेवत, आजसुद्धा मी वाचलेली एक गोष्ट सांगतो.
(सांगतो म्हणजे—मी लिहिणार आणि तुम्ही वाचणार आहात.)
मला आणि देवाला दिसतं आहे
एकदा एक काका देवदर्शनासाठी मंदिरात जातात.
देवळाच्या आवारात एक मूर्तिकार सुरेख मूर्ती घडवत असतो. जवळच त्यांना तशीच एक पूर्ण झालेली मूर्ती दिसते.
दोन्ही मूर्ती अगदी सारख्या पाहून ते आश्चर्याने विचारतात,
“आपल्याला एकसारख्या दोन मूर्ती घडवायच्या आहेत का?”
मूर्तिकार म्हणतो,
“नाही. आम्हाला एकाच मूर्तीची गरज आहे. पण पहिली मूर्ती शेवटी खराब झाली, म्हणून दुसरी बनवतो आहे.”
काकांनी पहिली मूर्ती बारकाईने पाहिली.
त्यांना कुठलाही दोष दिसला नाही.
म्हणून त्यांनी विचारलं,
“कुठे आहे दोष? काय खराब झालं आहे?”
मूर्तिकार शांतपणे म्हणाला,
“मूर्तीच्या नाकावर एक बारीकसा ओरखडा आहे.”
काकांनी विचारलं,
“ही मूर्ती कुठे ठेवली जाणार आहे?”
मूर्तिकार म्हणाला,
“समोर सात मीटर उंच चबुतऱ्यावर.”
काका हसत म्हणाले,
“इतक्या उंचीवरून हा लहानसा ओरखडा कोणाला दिसणार आहे?”
त्यावर मूर्तिकार पटकन म्हणाला,
“सर, बाकी कोणाला दिसो वा न दिसो—मला आणि परमेश्वराला तो दिसतो आहे.”
काका काही न बोलता मंदिरात गेले.
पण मूर्तिकाराचं ते शेवटचं वाक्य त्यांच्या मनाला लागलं.
मंदिरात जाण्याआधी त्यांनी स्वतःच्या चपला नीट काढल्या आणि आजूबाजूला पडलेल्या इतर चपलाही नीट लावून मग आत गेले.
ओढ ही आतूनच असावी लागते
आपण केलेलं काम कोणाला कसं वाटतं यापेक्षा,
“मी माझं काम उत्कृष्टच करणार”
ही ओढ आतून असणं जास्त महत्त्वाचं आहे.
अशी प्रेरणा मिळणं म्हणजे खरंच भगवंताची कृपा.
ही प्रेरणा हवी असेल तर एकच उपाय आहे—
ज्यांनी उत्कृष्टता मिळवली आहे, त्यांची चरित्रं वाचा.
पण आज उलट चित्र आहे.
उत्कृष्ट सोडून फालतू पाहण्याची प्रेरणा वारंवार होते—
रिल्स, शॉर्ट्स, फालतू गाणी, स्टेटस…
बेंचमार्कच जर इतका खालचा असेल,
तर उत्कृष्टतेकडे बघायचं कशासाठी?
म्हणून आजच्या गोष्टीतून इतकंच लक्षात ठेऊया—
आपण जे काही करतो, ते कोणाला दिसतं की नाही,
कोणी पाहतं की नाही, या साठी नाही.
मला उत्कृष्टच करायचं आहे कारण, मला आणि देवाला ते दिसतं आहे.
आपण भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपलं काम उत्कृष्ट पद्धतीने करण्यात व्यस्त रहा.
धन्यवाद 🙏
पुढच्या रविवारी?
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.
जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा

15 Comments
Last Sunday busy, so could not given my comments.
ReplyDeleteToday free relaxing ☺️
Perfection is important for any field.
Work to achieve excellence.
Good day.
Thank you for reading and sharing your thoughts.
DeleteAbsolutely agree — perfection and excellence come with consistent effort, and that’s what we all keep working towards.
Hope you enjoy today’s letter as well.
Have a relaxing day ☺️
पत्र व गोष्ट छान
ReplyDeleteखूप धन्यवाद!
Deleteतुम्हाला पत्र आणि गोष्ट आवडली हे ऐकून आनंद झाला.
असंच काहीतरी चांगलं पुढच्या रविवारी पुन्हा भेटेल 🙂
गोष्ट आता मुल YouTube वर च किंवा एखादे App वर च ऐकतात . गोष्टी सांगतानाचे हावभाव आणि ऐकणाऱ्या चेहऱ्यावरचे भाव खूप काही स्वभाव गुण सांगून जातात .
ReplyDeleteछान वाटले अजिंक्य आज ची गोष्ट वाचून.
कोणीतरी आपल्या कामाची नोंद घेते आहे ही feeling असली की ते काम करताना आपण विचार करतो आणि शक्यतो कोणी दुखावणार नाही याची काळजी घेतो.
मस्त ...परत रविवार म्हणजे विचार मंथन
असंच विचार मंथन पुढच्या रविवारी पुन्हा भेटेल.
Deleteमनापासून धन्यवाद 🙂
अजिंक्य गोष्ट छोटी पण अर्थ मोठा. खूप सहज मांडलेला विचार एक अर्थपूर्ण आणि दिशादर्शक आयुष्य घडवू शकतो.
ReplyDeleteहा चांगला विचारांचा खजिना जो तू दर आठवड्याला देतोस तो खरच खूप ऊर्जा देऊन जातो. खूप गोष्टी अंतर्मनात असतात पण जशी निखाऱ्यावर राख बसते तस झाल आहे. नेहमीचा धकाधकी च्या जीवनात ह्याचा विचार ही नाही होत.
तुझा ह्या वैचारिक देवाण घेवाण मुळे खरच खूप गोष्टी. चांगल्या विचाराना नव संजीवनी मिळते.
🙏🏻🙏🏻🙏🏻
तुमचे हे शब्द वाचून खूप आनंद आणि समाधान वाटलं.
Delete“निखाऱ्यावर राख बसल्यासारखं” हे उदाहरण खूप सुंदर आहे. खरंच, धकाधकीच्या आयुष्यात चांगले विचार कुठेतरी आत दडून जातात… आणि थोडंसं विचारमंथन झालं की ते पुन्हा जागे होतात.
ही वैचारिक देवाणघेवाण तुम्हाला उपयोगी वाटते आहे, हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा आहे.
मनापासून धन्यवाद 🙏
पुन्हा भेटूया येत्या रविवारी 🙂
राजाची आणि त्याच्या मुलाची गोष्ट पण अशीच आहे. जमीन तापली म्हणून त्यावर पांघरूण घालण्यापेक्षा आपल्या पायात चपला घालाव्यात. जगाला काय वाटेल या पेक्षा स्वतःला पटल पाहिजे, समाधान घेता आलं पाहिजे. तसंच या गोष्टीतही आपली चूक इतरांनी दाखवण्यापेक्षा आपल्याला कळून सुधारता आली पाहिजे.
ReplyDeleteअजिंक्य तुमची पत्र खरच विचार करायला लावतात. खूप छान वाटत. 🙏🙏🙏🙏🙏
Khup chan-👍🏼
ReplyDeleteखुप छान 🙏🙏👌👌👌
ReplyDeleteखुप छान.👌👌
ReplyDeleteआजची गोष्ट खरच खूप सुंदर कारण हे पटल तर आपल्या कडून सगळ्याच गोष्टी चांगल्याच होतील.
ReplyDeleteखूप धन्यवाद!
Deleteआजची गोष्ट तुम्हाला आवडली हे ऐकून आनंद झाला.
पुन्हा भेटूया येत्या रविवारी 🙂
आपली चूक आपल्याला कळून ती सुधारण्याची तयारी असली की आयुष्य अधिक सोपं आणि शांत होतं.
ReplyDeleteमाझी पत्रं तुम्हाला विचार करायला लावतात आणि आवडतात, हे ऐकून खूप आनंद झाला.
मनापासून धन्यवाद 🙏
पुन्हा भेटूया येत्या रविवारी 🙂