आपण सगळे लेखक!

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

        आज रविवार. नेहमीप्रमाणे तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी पुन्हा एकदा हजर आहे. गप्पा म्हणजे काय? मी वेळ मिळेल तेव्हा लिहिणार, तुम्ही वेळ मिळेल तेव्हा वाचणार… पण तरीही अगदी समोर बसून बोलतोय असं वाटणार. मेसेज, व्हॉट्सअॅप, मेसेंजर किंवा पत्र — माध्यम काहीही असो, मनाने आपण जवळ आलो की झालं!

        मी दोन ब्लू टिक झाले का हे बघत बसत नाही, किंवा अजून रिप्लाय का आला नाही असा विचार करत नाही. पण जेव्हा मनापासून रिप्लाय येतात, तेव्हा आनंद मात्र शब्दात मावत नाही. वेळ काढून प्रतिसाद देणाऱ्या प्रत्येकाचे मनःपूर्वक आभार. काही जण तर हे पत्र पुढे पाठवतातही — म्हणून “पोस्टमन ऑफ द वीक” असा एक पुरस्कार द्यायचा विचार मनात आहे!


    आज बोलूया माझ्या लिहिण्यामागच्या रहस्याबद्दल. कसे काय मी इतके पत्र रविवार ते रविवार न चुकता पाठवतो ते. लेट्स गो!

वाचण्यासारखा आणि लिहिण्यासारखा आनंद दुसरा नाही

        मागच्या आठवड्यात मी व. पु. काळे यांचे “आपण सारे अर्जुन” हे पुस्तक वाचत होतो. त्यात त्यांनी एक वाक्य लिहिलं आहे —
“जगात लेखक जर कोणी असेल तर ते एकच ऋषी व्यास. बाकी सगळ्यांना फक्त लिहिण्याचा हव्यास.”

        हे वाक्य वाचल्यावर मला स्वतःची आठवण झाली. मलाही लिहिण्याचा हव्यास आहे. म्हणूनच ही पत्रांची सुरुवात झाली. आणि खरं सांगायचं तर — ज्यांनी भरपूर वाचन केलं आहे, त्यांना कधीतरी असं वाटतंच की, “मीही एक दिवस लेखक बनेन.”

        मराठीत आपण “लेखक” म्हणतो, इंग्रजीत त्याला Author म्हणतात. त्या शब्दातच एक अधिकार (Authority) जाणवतो. पण कितीतरी कविता, लेख, विचार हे शाळा-कॉलेजच्या वहीच्या मागच्या पानांवरच राहून जातात. ना त्यांना वाचक भेटतो, ना त्या लेखकाला स्वतःची ओळख होते.

आजचं पत्र अशाच प्रत्येक लपलेल्या कवी आणि लेखकासाठी आहे. आणि खरं सांगू? प्रत्येक जण लेखक असतो.

दररोज मुलाला झोपण्याआधी एक गोष्ट सांगणारा बाबा — तो पण लेखकच.
आईने स्वयंपाकाची रेसिपी वहीत जपून लिहून ठेवली — ती पण लेखिका.
ज्याने रोज डायरीत आपले अनुभव लिहिले — तो स्वतःच्या आयुष्याचा लेखकच.

लेखन म्हणजे फक्त पुस्तक छापणं नाही.

आपण नेमकं कोणासाठी लिहितो?

एक शब्द ऐकला आहे का? Inhibition (इनहिबिशन) — म्हणजे संकोच, मनातली भीती, स्वतःलाच थांबवणं.

प्रश्न “लिहिता येत नाही” हा नसतो. प्रश्न असतो — “लोक काय म्हणतील?”
माझी कविता दुसऱ्यांना आवडेल का? टीका झाली तर?

आता सीक्रेट नंबर १ सांगतो —
आपण लिहितो ते स्वतःसाठी लिहितो.

दुसऱ्यांनी वाचलं, प्रतिक्रिया दिली — ते अतिरिक्त फायदे.
मी लिहितो कारण मला आवडतं.
मी लिहितो कारण माझे विचार जपून ठेवायचे असतात.
मी लिहितो कारण तो मेंदूचा व्यायाम आहे.
मी लिहितो कारण विसरभोळेपणापासून बचाव करायचा आहे.
मी लिहितो कारण मला स्वतःशी बोलायचं असतं.

एक उदाहरण देतो —
दररोज फक्त ५ मिनिटं “आज काय शिकलो?” असं लिहिलं, तरी वर्षभरात ३६५ छोटे अनुभव तयार होतात.
किंवा दर रविवारी एक छोटी गोष्ट लिहिली, तर वर्षभरात ५२ गोष्टी तयार!

एक कारण पुरेसं असतं काहीही करायला. न करण्यासाठी कारणं हजार असतात.

पेन की फोन?

आजकाल वही-पेन हातात कमी, आणि फोन जास्त.
पण काही हरकत नाही. फोनवरही आपण मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेत सहज लिहू शकतो.

“माझं अक्षर वाईट आहे” हा बहाणा संपला.
फोनवर सगळ्यांचं अक्षर सारखंच दिसतं!

महत्त्वाचं काय? — लिहायला सुरुवात करणं.

❓आज हे का सांगतो आहे?

मला लिहिण्याचे फायदे माहित आहेत म्हणून सांगतो आहे.

मला अनेकदा विचारतात — “तुला वेळ कसा मिळतो?”
उत्तर सोपं आहे — मी प्रत्येक रविवारी लिहिण्याचं एक कारण शोधतो.

तुम्हीही एक दिवस ठरवा. सोमवार, बुधवार, शुक्रवार — काहीही.
फक्त सातत्य ठेवा.


🤝 खास ऑफर

तुम्ही माझे वाचक नाही — मित्र आहात.
तुम्हालाही तुमचा लेख, कविता, अनुभव माझ्या पत्रासोबत शेअर करायचा असेल, तर मला नक्की कळवा. आनंदाने तुमच्या नावासह सगळ्यांपर्यंत पोहोचवेन. 

वहीच्या मागच्या पानावर राहिलेलं तुमचं लेखन बाहेर यायला हवं.

श्लोक लिहा.
कविता लिहा.
ओव्या लिहा.
गोष्टी लिहा.
किंवा फक्त “श्री राम जय राम जय जय राम” लिहा.

पण मेंदूचा व्यायाम सुरू करा. भेटूया पुढच्या रविवारी. 

पुढचा रविवार येईपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि काहीतरी लिहिण्यात व्यस्त रहा.

धन्यवाद 🙏
पुढच्या रविवारी सकाळी ९ वाजता भेटूया.

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा
👉 Email Newsletter Join करा



Post a Comment

9 Comments

  1. Nice 👌 तुस्सी ग्रेट हो!

    ReplyDelete
  2. You hit the nail on the, people are forgetting writing skills.
    Let’s start it again.
    Nice topic 👍👍

    ReplyDelete
  3. Khup chhan 👍👍A busy man has time to do everything 👍

    ReplyDelete
  4. खुप खर आहे .👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  5. Sameer Satish Mahimkar22 February 2026 at 12:53

    अजिंक्य; खरच तुमचं नाव खूपच समर्पक आहे. ह्या छोट्याशा उपक्रमा मधून तुम्ही सर्वांना; त्यांचा मनाला जिंकल आहात.
    काही लोक रोज समोर असून ही आपली नाही होत किंवा अस म्हणूया की दिसणं आणि असणं ह्यात खूपच फरक आहे.
    पण तुम्ही ह्या पत्राच्या आधारे आमचा सोबत जो एक दुवा सांधा जोडलात त्यानी दूर असून ही आपले वाटता त्यात तुमच कौशल्य दिसून येत. आजचा पत्रामधून जे तुम्ही सर्वांना व्यक्त होण्यासाठी नकळत प्रोत्साहन दिले आहे त्याबद्दल आभार.
    अशीच देवाणघेवाण चालू ठेवुया.
    👌🏻👌🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻.
    समीर माहीमकर.
    रोहा. रायगड.

    ReplyDelete
  6. Khup chan

    ReplyDelete
  7. Mast Ajinkya 👌🏻🫶🏻

    ReplyDelete
  8. Vaishali Parvekar23 February 2026 at 00:33

    सरळ आणि सोप्या पद्धतीने लिखाण करण्यासाठी encourage करत आहे अजिंक्य 👍प्रयत्न करणार मी पण आता वाचन सोबत लिखाण

    ReplyDelete
  9. या ह्रदयी चे त्या ह्रदयी असे तुझे लिखाण असते अजिंक्य!
    वाचन, श्रवण असेल तर लिखाण घडते.... हे सत्य तू समोर मांडले!
    लिहिण्याचे अनेक फायदे तू मांडले आहेस👌🏻
    विशेष म्हणजे तू लिखाणात मातृभाषेला प्राधान्य देतोस याचा मला आनंद आहे.

    आपल्या राधेशाम एज्युसोशल फाउंडेशनच्या वतीने देखील आपण एक मराठी लेखन चळवळ चालू केली आहे... त्याचे एक सुंदर पत्रक आहे ज्यात श्रद्धेय सुनील दादा चिंचोलकर यांनी लिखाणा विषयी सांगितलेली समर्पक गोष्ट देखील आहे..तू अनुमती देत असल्यास ते पत्रक मी या समूहावर पाठवू का??

    ReplyDelete