डोक्यावर नेमकं कोणाला घ्यावं?

।। श्री ।।

सप्रेम नमस्कार विनंती विशेष,

             सुरुवात नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार मानून करूया. “Gratitude should be the first step of anything you start in life” हे वाक्य मी एका पुस्तकात वाचलं होतं, आणि ते माझ्या मनात कायमचं बसलं आहे. म्हणूनच माझ्या प्रत्येक पत्राची सुरुवात कृतज्ञतेनेच होते. कदाचित तुम्हाला ती सारखी वाटत असेल, पण कृतज्ञता व्यक्त केल्याशिवाय मला पुढे लिहावंसं वाटत नाही.

    मागच्या आठवड्यात मी तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगितली होती. पण या आठवड्यात मला माझा एक वैयक्तिक अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे—बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घेतलेला एक खास अनुभव.

डोक्यावर नेमकं काय घेऊन जात आहेत सगळे?

        मी १ मे ला दार्जिलिंगला मधे होतो, आणि त्याच दिवशी बुद्ध पौर्णिमा ही होती. बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी एक वेगळंच दृश्य मला पाहायला मिळालं. खूप मोठी गर्दी होती. सगळे लोक डोक्यावर काहीतरी ठेवून कुठेतरी चालले होते. मला कुतूहल वाटलं, म्हणून मी गाडीतून उतरून तिथल्या एका स्थानिक व्यक्तीला विचारलं. त्यांनी शांतपणे सांगितलं, “ही आमची परंपरा आहे. आम्ही बुद्धांच्या शिकवणीचा सन्मान म्हणून हे पवित्र ग्रंथ डोक्यावर घेऊन मठाकडे जातो.” त्याने सांगितलं की हे ग्रंथ म्हणजे बुद्धांच्या ज्ञानाचं प्रतीक आहे, आणि त्यांना डोक्यावर घेणं म्हणजे त्या ज्ञानाला सर्वोच्च स्थान देणं. आम्ही त्यांच्यासोबत काही फोटोही काढले, आणि तो क्षण माझ्यासाठी खूप खास ठरला. 

        शीख धर्मामध्येही अगदी हाच भाव दिसतो. ते “गुरु ग्रंथ साहिब” याला जिवंत गुरूसारखा मान देतात. गुरुद्वारामध्ये हा ग्रंथ अत्यंत आदराने ठेवला जातो, त्यावर छत्र धरलं जातं. इथेही मूळ भावना तीच आहे—ग्रंथ म्हणजे फक्त पुस्तक नाही, तर तो मार्गदर्शक आहे.

        आपल्या हिंदू परंपरेतही असे अनेक प्रसंग आहेत. गावांमध्ये कथा, भागवत किंवा रामायण सुरू होण्यापूर्वी ग्रंथाची मिरवणूक काढली जाते. काही ठिकाणी “पोथी” डोक्यावर घेऊन मंदिरात आणली जाते. लोक त्यावेळी फुलं, आरती आणि वाजत-गाजत स्वागत करतात. यामध्येही एकच संदेश असतो—आपण ज्ञानाला देवासारखं मानतो, आणि त्याचा आदर करतो.

आपण डोक्यावर कोणाला घेतो?

        जर ग्रंथ इतके महान असतील, तर एक प्रश्न स्वतःला विचारायला हवा—आपण खरोखर डोक्यावर कोणाला घेतो?

        आज फायनल मॅच आहे म्हणून “आम्ही सगळे घरी जमणार आहोत आणि मॅच बघणार आहोत,” हे वाक्य आपण कित्येक वेळा ऐकलं आहे. पण “आज आमच्या घराजवळच्या मंदिरात भागवत कथा आहे, म्हणून आम्ही सगळे तिथे जाऊन ऐकणार आहोत,” असं किती वेळा ऐकायला मिळतं? फार कमी… किंवा जवळजवळ नाहीच. 

        उलट आपण काय ऐकतो? “चल शेवटच्या दिवशी कथेला जाऊया, भंडारा असतो, जेवायला मिळतं.” हे बोलताना कदाचित आपल्याला काही वाटत नाही, पण नकळत आपण त्या कथेला, त्या परंपरेला आणि त्या ज्ञानालाच कमी लेखतो. आणि फक्त स्वतःपुरतंच नाही—आपल्यापेक्षा लहान कोणी हे ऐकत असेल, तर त्यांच्या मनातही तिथूनच एक समज तयार होतो की अशा गोष्टींमध्ये काही विशेष नाही, त्यात इंटरेस्ट घेण्यासारखं काही नाही.

    “मी ऑफिसला सुट्टी मारून मॅच बघणार आहे,” आणि “कथा-कीर्तन कुठे या वयात ऐकायचं? म्हातारपणी बघू,” ही वाक्यं त्या क्षणी थोडं हास्य निर्माण करतील, पण त्याचा परिणाम मात्र खोलवर जातो. आपण नकळत काय महत्त्वाचं आहे आणि काय नाही, हे ठरवून टाकतो—फक्त स्वतःसाठी नाही, तर आपल्या आसपासच्या लोकांसाठीही.

        मला काय वाटतं ना, मॅच बघायला आवडते—नक्की बघा. त्यात काही चुकीचं नाही. पण मॅच बघणं हे आपल्या कामापेक्षा, जबाबदाऱ्यांपेक्षा, किंवा शिकण्यापेक्षा वरचं आहे, असा संदेश आपल्या बोलण्यातून जाऊ नये, एवढंच. 

        नसेल यायचं कथेला—ठीक आहे, येऊ नका. पण त्याबद्दल चुकीची किंवा कमी लेखणारी टिप्पणी करू नका. कारण आपण जे बोलतो, ते फक्त शब्द नसतात—ते कोणाच्या तरी विचारांची दिशा ठरवू शकतात.  

माझं सोडा समर्थांचा तर ऐकणार ना तुम्ही?

    दासबोध ग्रंथामध्ये एक ओवी आहे. दशक ११ समास ३ सिकवणनिरूपण त्या मधल्या काही ओव्या मी इथे लिहितो आहे. 

प्रातःकाळीं उठावें ⁠। कांहीं पाठांतर करावें ⁠। येथानशक्ति आठवावें ⁠। सर्वोत्तमासी ⁠।⁠।⁠ १५ ⁠।⁠।

मुखमार्जन प्रातःस्नान ⁠। संध्या तर्पण देवतार्चन ⁠। पुढें वैश्यदेव उपासन ⁠। येथासांग ⁠।⁠।⁠ १७ ⁠।⁠। 

कांहीं फळाहार घ्यावा ⁠। मग संसारधंदा करावा ⁠। सुशब्दें राजी राखावा ⁠। सकळ लोक ⁠।⁠।⁠ १८ ⁠।⁠। 

ज्या ज्याचा जो व्यापार ⁠। तेथें असावें खबर्दार ⁠। दुश्चितपणें तरी पोर ⁠। वेढा लावी ⁠।⁠।⁠ १९ ⁠।⁠। 

चुके ठके विसरे सांडी ⁠। आठवण जालियां चर्फडी ⁠। दुश्चित आळसाची रोकडी ⁠। प्रचित पाहा ⁠।⁠।⁠ २० ⁠।⁠। 

याकारणें सावधान ⁠। येकाग्र असावें मन ⁠। तरी मग जेवितां भोजन ⁠। गोड वाटे ⁠।⁠।⁠ २१ ⁠।⁠। 

पुढें भोजन जालियांवरी ⁠। कांहीं वाची चर्चा करी ⁠। येकांतीं जाऊन विवरी ⁠। नाना ग्रंथ ⁠।⁠।⁠ २२ ⁠।⁠। 

तरीच प्राणी शाहाणा होतो ⁠। नाहींतरी मूर्खचि राहातो ⁠। लोक खाती आपण पाहातो ⁠। दैन्यवाणा ⁠।⁠।⁠ २३ ⁠।⁠।    

            दासबोधातील या ओव्या वाचताना एक गोष्ट खूप स्पष्टपणे जाणवते—समर्थ रामदास स्वामी आपल्याला केवळ पूजा किंवा विधी सांगत नाहीत, तर एक पूर्ण जीवनशैली शिकवतात. “प्रातःकाळीं उठावें, कांहीं पाठांतर करावें” म्हणताना ते दिवसाची सुरुवात ज्ञानाने करण्याचा संदेश देतात. “येथानशक्ति आठवावें सर्वोत्तमासी” म्हणजे जे काही सर्वोत्तम आहे—ते वाचा, ते आठवा, ते मनात ठेवा. पुढे ते सांगतात की स्नान, संध्या, उपासना करून थोडा आहार घ्यावा आणि मग आपल्या कामाला लागावं—पण तेही सावधपणे, एकाग्रतेने.

“ज्या ज्याचा जो व्यापार, तेथें असावें खबर्दार” ही ओळ तर अगदी सरळ आणि स्पष्ट आहे—आपण जे काम करतो, ते चोख आणि जबाबदारीने करावं. नाहीतर लोक आपल्याला फसवू शकतात. पुढे ते आळस, विसराळूपणा आणि दुर्लक्ष याबद्दलही सांगतात—हे सगळं आपल्यालाच मागे खेचतं. म्हणूनच “याकारणें सावधान, येकाग्र असावें मन” हा त्यांचा आग्रह आहे. आणि जेव्हा माणूस दिवसभर प्रामाणिकपणे काम करतो, तेव्हा साधं जेवणही गोड लागतं—हा अनुभव प्रत्येकाने घेतलेलाच असतो.

        समर्थ पुढे एक महत्त्वाची गोष्ट सांगतात—“पुढें भोजन जालियांवरी, कांहीं वाची चर्चा करी, येकांतीं जाऊन विवरी, नाना ग्रंथ.” म्हणजे फक्त वाचणं नाही, तर त्यावर चर्चा करणं आणि मग शांतपणे चिंतन करणं. हेच खरं ज्ञान आत्मसात करण्याचं साधन आहे. आणि शेवटी ते ठामपणे सांगतात—“तरीच प्राणी शाहाणा होतो, नाहींतरी मूर्खचि राहातो.” म्हणजेच, ज्ञानाचा उपयोग केला तरच माणूस घडतो, नाहीतर तो तसाच राहतो.

        समर्थांनी जे सांगितलं आहे, ते आपण जर मनापासून केलं, तर आपण खरंच ग्रंथ “डोक्यावर” घेतो. डोक्यावर घेणं म्हणजे फक्त शारीरिक कृती नाही—तर त्या ज्ञानाला आपल्या विचारांमध्ये, सवयींमध्ये आणि आयुष्यात सर्वोच्च स्थान देणं.

        म्हणूनच, आजपासून एक छोटा बदल करूया. रोज एक ओवी वाचा. घरात ग्रंथाला योग्य जागा द्या—स्वच्छ, नीटनेटकी, आदराची. फक्त शोभेसाठी नाही, तर वापरासाठी. घरात येणाऱ्या, ज्यांना आवड आहे अशा लोकांसोबत त्या ग्रंथाविषयी चर्चा करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं—वाचलेलं थोडंसं का होईना, पण आचरणात आणा.

बस्स… इतकं जरी केलं, तरी आपणही खऱ्या अर्थाने ग्रंथ डोक्यावर घेतले, असं म्हणता येईल.

आपण भेटूया पुढच्या रविवारी पुन्हा एका नवीन गोष्टीसोबत किंवा अनुभवासोबत. 

तोपर्यंत—
स्वस्थ रहा, मस्त रहा आणि ग्रंथाना डोक्यावर घेण्यात व्यस्त रहा. 

धन्यवाद 🙏

जर तुम्हाला आमचं पत्र नियमित मिळावं असं वाटत असेल, तर—
👉 WhatsApp ग्रुप Join करा

👉 Email Newsletter Join करा








Post a Comment

4 Comments

  1. अजिंक्य खूप छान.🌹🌹पत्र लिहण्याचा उपक्रम स्तुत्य, त्यामधून जे काही सोप्या भाषेत विचार मांडतोस ते मस्तच.

    ReplyDelete
  2. खुप छान पत्र 👌👌नकळत परंपरेला ज्ञानाला आपण कमी लेखतो हे अगदि बरोबर आहे👍🏻

    ReplyDelete
  3. Ganpat Deshmukh7 May 2026 at 22:09

    Khup chan 👌

    ReplyDelete
  4. Yes....वाचलेले जरा तरी अंगिकारावे ...perfectly this should be the msg of this week. नक्की प्रयत्न करेन आज पासून च 👍

    ReplyDelete